आज एक जुलै म्हणजेच डॉक्टर्स डे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा डॉक्टर्स डेला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. जगासमोर करोनाचे संकट उभं असतानाच डॉक्टर्स मात्र जगाला या संकटाच्या तोंडातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून जगभरातील डॉक्टर्स स्वत:चा जीव धोक्यात घालून करोनाबाधितांचे प्राण वाचवत आहेत. असं असतानाच एका लहानश्या देशाने मात्र या करोनायोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. जगातील सर्वात छोटं क्षेत्रफळ असणाऱ्या देशांपैकी एक असणाऱ्या लॅटवियाने करोनाविरुद्धच्या लढाईतील पहिल्या फळतील योद्धे असणाऱ्या डॉक्टरांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभं केलं आहे. या देशातील राजधानीमध्ये डॉक्टरांचा एक २० फूटांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

उत्तर युरोपमध्ये असणाऱ्या लॅटविया देशातील रिगा शहरात एका महिला डॉक्टराचा पुतळा उभा करण्यात आला आहे. येथील लॅटीव्हियन नॅशनल म्युझियम म्हणजेच राष्ट्रीय संग्रहालयाबाहेर हा पुतळा उभा करण्यात आला आहे. अँगारस बिक्सी या शिल्पकाराने हा पुतळा साकारलेला आहे. एक महिला डॉक्टरचा अॅप्रन, गळ्यात थेटस्कोप  आणि हातात ग्लोव्हज घालून हात पसरवून आकाशाकडे पाहत असलेला पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. हे शिल्प बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागल्याने बिक्सी यांनी रॉयटर्सला सांगितलं. रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर आपले प्राण संकटात टाकत असल्याचे पाहून आपल्याला हे शिल्प साकारण्याची प्रेरणा मिळाली असं शिल्पकाराने सांगितलं.

“बातम्या पाहताना आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना किती अडचणींना समोरे जावे लागत आहे हे मला जाणवले. इटलीमध्ये तर काही डॉक्टरांना थेट जमीनीवर झोपावे लागल्याचे वृत्तही मी पाहिले. मास्क घालून डॉक्टरांच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा मी पाहिल्या. हे सर्व पाहून मुर्तीकार म्हणून मी व्यक्त झालं पाहिजे असं माला वाटलं आणि मी हे शिल्प साकारलं,” असं बिक्सी म्हणाले.

लॅटविया सरकारच्या या निर्णयाचं सोशल मिडियावरुन चांगलं कौतुक होताना दिसत आहे.