दिल्लीमधील हिंसाचाराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमधील एका फोटोत पोलीस कर्मचारी लहान मुलाला मारहाण करताना दिसत आहे. हा फोटो दिल्ली पोलिसांची निर्दयता दर्शवणारा असल्याचं बोललं जात आहे. पण हा फोटो दिल्लीमधील हिंसाचाराचा नसून बांगलादेशमधील आहे. हा फोटो १० वर्ष जुना आहे.

फेसबुकवर एका युजरने हा फोटो शेअर करत दिल्ली पोलिसांची दहशत असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे दिशाभूल करणारी ही पोस्ट २७ हजाराहून जास्त वेळा शेअर करण्यात आली आहे. इतर अनेक युजर्सनी हा फोटो फेसबुक आणि ट्विटरवर शेअर केला आहे.
/>

पण या व्हायरल फोटोचं तथ्य तपासून पाहिलं असता सत्य समोर आलं आहे. हा फोटो २०१० मध्ये गार्डियनने वापरला होता. यावेळी त्यांनी फोटोला कॅप्शन देताना लिहिलं होतं की, “बांगलादेशमध्ये कपडा कामगारांचं आंदोलन सुरु असताना पोलीस लहान मुलाला मारहाण करण्याच्या तयारीत असताना”.

कमी पगार आणि काही सुविधा उपलब्ध नसल्याने ढाका येथे कामगारांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला होता.

 

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी अश्रूधूर, पाण्याचा वापर केला होता. या आंदोलनात अनेक लहान मुलंही सहभागी झाली होती. हा फोटो Getty Images वर देखील याच माहितीसोबत उपलब्ध आहे. हा फोटो ३० जून २०१० रोजी काढण्यात आला होता.