‘जलविद्युत प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील वीज (शक्ती) निघून जाईल तेव्हा अशी शक्ती गमावलेले पाणी शेतीसाठी वापरले तर त्याचा काय उपयोग?’ असे वाक्य राजस्थानचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांच्या तोंडी आहे. २६ मे रोजी झालेल्या एका पत्रकार परिषदेत गेहलोत हे तसे बोलत असल्याचे स्पष्ट ऐकूही येते. मात्र याच संदर्भातील साधारण १६ सेकंदांची प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीने अनेकांना तोंडघशी पाडले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस संबित पात्रा यांनी कोणतीही शहानिशा न करताच, गेहलोत यांच्या तथाकथित म्हणण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेहलोत म्हणाले ते खरे आहे का? देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा हा काँग्रेसचा हा नवा मार्ग आहे का, असे पोटतिडकीने विचारले . ही ध्वनिचित्रफीत ‘माय गव्हर्मेट’चे माजी संचालक हृषीकेश मिश्रा यांनी ‘शेअर’ केली आणि थोडय़ा वेळाने ‘डिलिट’ही करून टाकली. या साऱ्या ट्विप्पणीयुद्धात वस्तुस्थिती मागे पडली.

खरे तर गेहलोत यांनी केलेले पाण्याविषयीचे विधान हे संघपरिवाराच्या प्रचारकी तंत्राविषयी होते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात भाक्रा धरण बांधण्यात आले. त्या वेळी संघ परिवाराने त्याविरोधात प्रचार सुरू केला होता. गेहलोत म्हणाले, ‘मला आठवते, माझ्या बालपणी संघाचे कार्यकर्ते जिथतिथे व्याख्याने देत फिरत होते. ते विचारीत, भाक्रा धरणातील वीजनिर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यातील वीजच (शक्ती) नष्ट केली जाणार आहे, त्यामुळे असे शक्तीहीन पाणी शेतीसाठी वापरण्यात काय उपयोग?’

भाजपच्या ट्विटरवरील प्रचारावर अशोक गेहलोत यांनी जोरदार प्रहार करताना नेत्यांच्या बेजबाबदारपणा उघड केला.