‘जेम्स बॉण्ड’ अर्थात शॉन कॉनेरी याचं वयाच्या ९०व्या वर्षी नुकतचं निधन झालं. यानिमित्त त्यांच्या अभिनय कारकिर्दीची आणि सेलिब्रिटी वलयाची पुन्हा एकदा सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. त्यातच २२ वर्षांपूर्वीचं कॉनेरी यांनी अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना लिहिलेलं एक पत्रही सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आहे. याआधी ९ वर्षांपूर्वीही ते व्हायरल झालं होतं. यामध्ये कॉनेरी यांनी ‘अॅपल’च्या जाहिरातीची ऑफर वाईट पद्धतीनं धुडकावल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे पत्र फेक असल्याचं नऊ वर्षांपूर्वीच स्पष्ट झालं होतं.

सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेलं हे पत्र वाचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावतील. कारण जी तारीख (११ डिसेंबर १९९८) या पत्रावर आहे, त्यावेळी अॅपल कंपनीचा संघर्षाचा काळ होता तर शॉन कॉनरी हे मोठे फिल्मस्टार होते. त्यांनी या पत्राद्वारे अॅपलचे मालक स्टीव्ह जॉब्स यांना हे पत्र लिहिलं आहे.

या पत्रात स्टीव्ह जॉब्स यांचा कॅलिफोर्नियातील संपूर्ण पत्ता दिलेला आहे. तसेच कॉनरी त्यांना कथीतरित्या लिहितात की, “तुम्हाला इंग्रजी कळतं की नाही? मी हे पुन्हा एकदा सांगतो की, मी माझा आत्मा अॅपल किंवा इतर कुठल्याही कंपनीच्या जाहिरातीसाठी विकणार नाही. मला तुम्ही सुचवल्याप्रमाणे जग बदलण्यामध्ये रस नाही. मला ज्याची गरज आहे त्यांपैकी तुमच्याकडे काहीच नाही. तुम्ही कॉम्प्युटर विक्रेते आहात आणि मी ….जेम्स बॉण्ड. मला वाटतं की तुमच्या जाहिरातीत झळकून स्वतःच करिअर उद्ध्वस्त करण्याचा यापेक्षा वेगवान मार्ग नाही. त्यामुळे तुम्ही मला पुन्हा संपर्क करु नका. तुमचा शॉन कॉनेरी.” या मजकुरानंतर पत्राच्या शेवटी कॉनेरी यांची सही आणि खाली उजव्या कोपऱ्यात ००७ हा जेम्स बॉण्डचा सिम्बॉलही छापलेला आहे.

खरतरं हे पत्र २१ जून २०११ रोजीचं ट्विटरवर व्हायरल झालं होतं. त्यावेळी माध्यमांनी या पत्राबाबत खुलासे केले होते. पहिल्यांदा हे पत्र समोर आल्यानंतर मोठी खळबळही माजली होती. अनेकांना त्यावेळी ही बाब खरीही वाटली होती. मात्र, आता शॉन कॉनेरी यांच्या निधनानंतर ते पुन्हा एकदा व्हायरल झालं आहे.