भेंडी ही लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि अ आणि क जीवनसत्त्वांचा समृद्ध स्त्रोत म्हणून ओळखली जाणारी भेंडी देशातील जवळजवळ प्रत्येक रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये आहे.पण आता मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका शेतकऱ्याने या हिरव्या भाजीला एक वळण दिले आहे. मिसरीलाल राजपूत त्याच्या बागेत तांबडी भेंडी पिकवत आहे आणि सध्याच्या नैसर्गिक जातींपेक्षा ते निरोगी असल्याचा दावा ते करतात.

“मी वाढवलेली भेंडी नेहमीच्या हिरव्या रंगाऐवजी लाल रंगाची आहे. ती हिरव्या भेंडीपेक्षा जास्त फायदेशीर आणि पौष्टिक असते. हृदय आणि रक्तदाब, मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉलचा सामना करणाऱ्या लोकांसाठी ही अत्यंत फायदेशीर आहे,” राजपूत ANI शी बोलतांना सांगतात. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत. “ही भेंडी सामान्य भेंडीच्या तुलनेत ५-७ पटीने महाग आहे. काही मॉल्समध्ये ही भेंडी -७५ – ८० ते ३०० – ४०० प्रति २५० /५०० ग्रॅम पर्यंत विकली जात आहे,” राजपूत सांगतात
भोपाळ जिल्ह्यातील खजुरी कलाण भागातील शेतकऱ्याने सांगितले की त्याने वाराणसी येथील कृषी संशोधन संस्थेकडून १ किलो बियाणे खरेदी केले. सुमारे ४० दिवसात, ते वाढू लागले. राजपूत म्हणाले की, लाल भेंडीच्या लागवडीदरम्यान कोणत्याही हानिकारक कीटकनाशकांचा वापर केला गेला नाही. एक एकर जमिनीवर किमान ४०-५० क्विंटल आणि जास्तीत जास्त ७०-८० क्विंटल लागवड करता येते.

महाराष्ट्रातही लागवड

औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट, अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला. तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.

या भेंडीचा सरासरी दीड महिन्यानंतर पहिला तोडा होतो. पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला. त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.

गर्भवतींना भेंडीची भाजी अतिशय उपयुक्त ठरते. पचण्यास हलकी. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त.