दिल्लीच्या आझादपूर येथे झोपडीवजा घरात राहणारा एक तरुण थेट उसेन बोल्टच्या अॅकॅडमीत प्रशिक्षणासाठी जाणार आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना १६ वर्षांच्या निसार अहमदसाठी ही गोष्ट म्हणजे अक्षरश: एक सुवर्णसंधीच आहे. घरची परिस्थिती बेताची असताना या तरुणामध्ये कमालीची जिद्द आहे. निसारचे वडिल रिक्षाचालक असून ते दिल्लीमध्ये रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा ओढतात. तर त्याची आई घरकाम करुन संसाराला हातभार लावते. आई-वडिल दोघांची कमाई मिळून घरात केवळ ५ हजार रुपये येत असताना निसारच्या डोळ्यातील स्वप्न आणि परिस्थितीशी दोन हात करत त्याचा सुरु असलेला संघर्ष कौतुकास्पद आहे.

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया आणि स्पोर्टस मॅनेजमेंट कंपनीने त्याची वेस्टइंडिजमध्ये होणाऱ्या प्रशिक्षणासाठी निवड केली. या ट्रेनिंगसाठी देशभरातील १४ युवा तरुणांची निवड झाली असून निसार हा त्यातील एक आहे. विशेष म्हणजे या आधीही निसार विविध चर्चांमध्ये आला होता. पहिल्यांदा निसारने दिल्ली राज्य अॅथलेटीक्स स्पर्धेत सहभागी होत १०० मीटर धावण्यात आपली चमक दाखवून दिली होती. त्याने काही राष्ट्रीय स्तरावरील रेकॉर्ड मोडली आहेत. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात निसारने ११ सेकंदात १०० मीटर अंतर पार केले होते. याशिवाय आणखी २०० मीटरचे एक रेकॉर्डही मोडले असून हे अंतर त्याने २२ सेकंदामध्ये पार केले आहे.

उसेन बोल्टच्या अॅकॅडमीमध्ये बोल्टचे प्रशिक्षक ग्लेन मिल्स त्याला विशेष प्रशिक्षण देऊन त्याच्यातील खेळाडूला आणखी तयार करतील. हे प्रशिक्षण जवळपास एक महिन्याचे असेल असेही सांगण्यात येत आहे. पण यामुळे निसार उद्याचा आघाडीचा धावपटू म्हणून नावाला येऊ शकतो.