गाढवाच्या ओरडण्याचा आवाज तुम्ही नक्की ऐकला असेल, पण गाढव गात असलेले तुम्ही कधी पाहिलंय? बहुदा नाहीच. पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमी ऐकतो. त्याचप्रमाणे याठिकाणी याही गोष्टीचे उणे नसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका ठिकाणी गाढव गाणे गात असल्याचे समोर आले आहे. या गाढवाचा सुरेल गातानाचा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आणि त्याविषयीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. एक स्वयंसेवी संस्था या गाढवाची देखभाल करत आहे. या स्वयंसेवी संस्थेची सदस्य टीना मोहनदास याबाबत माहिती देताना म्हणाल्या, ही गाढवीण अतिशय गंभीर अवस्थेत रस्त्यांवर पडलेली सापडली. ती आम्हाला जेव्हा सापडली तेव्हा तिने एका पिल्लाला जन्म दिला होता आणि ते पिल्लू मेलेले होते.

ती गंभीर अवस्थेत असताना त्या परिस्थितीतून आम्ही तिला आमच्या संस्थेत घेऊन आलो. तिच्यावर आवश्यक ते वैद्यकीय उपचार सुरु केले. सुरुवातीला ती खूप चिडचिड करत होती, कोणालाही आपल्या आसपास येऊ देत नव्हती. मात्र वेळीच उपचार केल्याने आता तिची प्रकृती स्थिर आहे. आमच्या केंद्रात असलेल्या इतर गाढवांसोबत ती चांगल्या पद्धतीने राहत आहे असेही संस्थेच्या या सदस्यांनी सांगितले. आता ती अचानक गायला लागली असून मी याठिकाणी येऊन किती खूश आहे हेच ती जणू आम्हाला सांगत आहे. गाढव खूश असल्यावर गातात असा आमचा अंदाज आहे असे या स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा नेहा पंचामिया म्हणाल्या. गाणाऱ्या गाढवाचा व्हिडियो संस्थेच्या ऑफीशियन हँडलवर अपलोड करण्यात आला असून नेटीझन्सनी त्याला जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडियो पाहून तुम्ही नक्की चकीत व्हाल.