भारताचा धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग हा आपल्या हटके ट्विटमुळे कायम चर्चेत असतो. कोणत्याही विषयावर खास शैलीत ट्विट करणं हा यात त्याचा हातखंडा आहे. सेहवागने नुकताच एक असाच हटके व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक चिमुरडा सहजतेने JCB चालवताना दिसतो आहे. विशेष म्हणजे त्या चिमुरड्याचे वय अवघे पाच वर्षे असल्याचे सांगितलं जात आहे. JCB मशीन पाहून बऱ्याच लोकांना घाम सुटतो आणि ऑपरेट करणे फार कठीण मानले जाते. JCB मशीन चालविण्यासाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण आवश्यकता असते. परंतु या पाच वर्षीय मुलाने कौशल्यपूर्ण पद्धतीने JCB चालवल्याचे दिसत आहे.

पाहा व्हिडीओ –

सेहवागने पोस्ट केलेल्या व्हिडीओत एक मुलगा तंत्रशुद्ध वाहनचालकाप्रमाणे JCB चालवत आहे. पाच वर्षीय मुलाचा व्हिडिओ सेहवागने शेअर केल्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. राजेश असं या मुलाचं नाव आहे. व्हिडीओत हा मुलगा अवजड असे मशीन ड्राईव्हिंग ऑपरेट करताना दिसत आहे. JCB च्या सहाय्याने तो सहजतेने वाळूचा ढीग उचलतो आहे.

५ वर्षाच्या चिमुरड्याची कामगिरी पाहून बरेच लोक आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींना त्याचे वय पाहून या गोष्टीबाबत चिंता व्यक्त केली आहे. सेहवागने मात्र हा व्हिडिओ पोस्ट करताना त्या चिमुरड्याचे कौतुक केले असल्याने काहींनी सेहवागवर तोंडसुख घेतले आहे.