तुम्ही ज्यांच्याकडून उपचार घेत आहात ती डॉक्टर महिला असेल तर तुमच्यासाठी एक सुखावणारी बातमी आहे. कारण जर रुग्ण महिला डॉक्टरच्या देखरेखीखाली उपचार घेत असेल, तर तो पूर्णपणे बरा होऊन त्याला वारंवार डॉक्टरांकडे यावे लागत नाही. तसेच त्याचे आयुर्मानही वाढते. महिला डॉक्टरांची उपचारपद्धती ही रुग्णांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. ‘हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या संधोधकांनी १५ लाख रुग्णालयातून संशोधन केले असून, १९ डिसेंबरला ‘जेएएमए इंटरनल मेडीसीन’मध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले.

वाचा : रात्री ‘हे’ पदार्थ खाणे आवर्जुन टाळा

महिला डॉक्टरने आतापर्यंत ज्या रुग्णांवर उपचार केले आहेत त्यापैकी वर्षाला ३२ हजार लोकांचे प्राण त्यांनी वाचवले, असे या संशोधनात म्हटले आहे. यासाठी त्यांनी १५ लाख रुग्णालयात संशोधन केले. वाहन अपघातातील रुग्णांवर आधारित हे संशोधन होते. या अपघातातील ज्या रुग्णांवर महिला डॉक्टरने उपचार केले त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा पाहायला मिळाल्या आहेत, असे या संशोधनात म्हटले आहे. पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत महिला डॉक्टर या अधिक चांगल्या प्रकारे आपल्या रुग्णांशी संवाद साधतात. पण संवाद कौशल्याचा रुग्णांवर किती परिणाम होतो, हे मात्र यात सांगितले नाही. त्याचबरोबर महिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली एखाद्या रुग्णावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर किमान महिनाभर तरी त्याला पुन्हा रुग्णालयात यावे लागत नाही, असाही एक निष्कर्ष या संशोधनात काढण्यात आला आहे.

२०११ ते २०१४ या चार वर्षांतील एकूण आकडेवारी आणि माहितीवर आधारित हे संशोधन आहे. जर महिला डॉक्टरने एखाद्या रुग्णावर उपचार केले तर डिस्चार्ज दिल्यानंतर महिन्याभराच्या आत रुग्णालयात परतण्याची शक्यता ४ टक्के कमी असते, असे यातून समोर आले आहेत. तसेच माहिला डॉक्टरने उपचार केलेल्या आणि प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाची मृत पावण्याची शक्यताही ५ टक्क्यांनी कमी असते. शिकागो वैद्यकिय महाविद्यालयाचे प्राध्यापक विनित अरोरा यांनी या संशोधनाची स्तुती केली. पण त्याचबरोबर वेगवेगळ्या परिस्थितीनुसार याचे परिणामही वेगळे असू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. काही ठराविक घटक आणि निकषांवर हे संशोधन आहे. पण, वेगवेगळ्या परिस्थितीत याचे परिणाम या संशोधनापेक्षाही उलट येऊ शकतात असे त्यांनी नमूद केले.
(टीप : ही बातमी हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच जेएएमए इंटरनल मेडीसिनमध्ये प्रकाशित झालेल्या प्रबंधावर आधारित आहे. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. )

वाचा : कार्यालयाबाबत कर्मचा-यांच्या ‘या’ तक्रारी जास्त असतात