भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रक्षेपणाची सर्व तयारी पूर्ण केली असून चांद्रयान-२चे उड्डाण आज सोमवारी, दुपारी २.४३ वाजता होत आहे. भारताची ही मोहिम खास असून वैज्ञानिकांनी त्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. चांद्रयान-२ चंद्रापर्यंत पोहोचण्यास ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लागणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट भारताचे आहे. चंद्राच्या या भागापर्यंत अद्याप कोणताही देश पोहोचू शकलेला नाही.

चांद्रयान-२ लाँच होताना पाहणं प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. परिणामी इस्रोने जगातील कोणत्याही ठिकाणी असलेल्या भारतीय नागरीकाला हे पाहता यावं अशी व्यवस्था केली आहे. तर, जाणून घेऊया हा ऐतिहासिक क्षण ऑनलाइन कशाप्रकारे पाहता येईल.

मोहीम लाइव्ह कशी पाहायची –

श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरकडून ही मोहीम लाइव्ह पाहण्यासाठीची नोंदणी बंद झाली आहे. पण लाइव्ह स्ट्रीमिंगद्वारे तुम्ही ही मोहीम कुठेही पाहू शकतात. यासाठी केवळ एकच अट आहे, ती म्हणजे तुमच्याकडील इंटरनेटचा स्पीड चांगला असायला हवा. इस्रोकडून आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर प्रक्षेपणाची लाइव्ह स्ट्रीमिंग असेल. याशिवाय दूरदर्शनवर देखील ही मोहीम लाइव्ह पाहता येईल. दूरदर्शनच्या YouTube चॅनलवर देखील ही मोहीम लाइव्ह पाहता येणार आहे. दुपारी २ वाजून १० मिनिटांनी लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू होईल.