चित्र काढणे ही एक कला असून ती अवगत असावी लागते. काही वेळा सरावाने यामध्ये सुधारणा करता येतात पण या कलेसाठी कलाकाराची त्या कलेप्रती असणारी साधना आणि कौशल्य यांनाच विशेष महत्त्व आहे. हाताने चित्र काढतानाही अनेकदा कलाकाराला हवे ते आकार साकारत नाहीत. पण हैद्राबादमधील एका मुलीने पायाने सर्वात मोठे चित्र काढण्याचा विक्रम केला आहे. जान्हवी मांगती या मुलीने १४० स्क्वेअर मीटर इतके मोठे चित्र आपल्या पायाने काढत एक आगळेवेगळे रेकॉर्ड बनवले आहे. ब्रिटनमधील वार्विक विद्यापीठात अर्थशास्त्र आणि इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशनचे शिक्षण घेणाऱ्या जान्हवीने आतापर्यंत असलेले रेकॉर्ड तोडले आहे. याआधीचे रेकॉर्ड १०० स्क्वेअर मीटरचे असल्याचे ती म्हणाली. या रेकॉर्डसाठी तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असल्याचेही सांगितले.

उत्तम चित्र काढण्याबरोबरच जान्हवी शास्त्रीय गायन करते. तसेच राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉलची खेळाडूही आहे. विशेष म्हणजे जान्हवी नृत्यांगनाही आहे. नृत्य करता करता पायाने चित्र काढण्याचा प्रयोग तिने याआधी केला होता. यामध्ये तिने कमळाचे फूल आणि मोरपिसे काढली होती. आताचे चित्रही तिने अतिशय उत्तम पद्धतीने काढल्याचे आपल्याला दिसते. तिच्या या उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ अनेकांनी काढले आहेत. ते सोशल मीडियावर व्हायरलही होत असून नागरिकांकडून तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे