गेल्या महिन्यात सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झालेला हा फोटो तुम्हा सगळ्यांना चांगलाच आठवत असेल. शाळेत कॉम्प्युटर नसल्यानं घाना मधला हा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना फळ्यावरच ‘MS Word’चे धडे देत होता. मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन झाल्यावर कसं दिसतं हे खडूने काढून त्यानं दाखवलं होतं. एमएस वर्डमधले एक एक मेन्यू या शिक्षकाने फळ्यावर काढले. आपल्या विद्यार्थ्यांना या विषयाची तोंडओळख करून देताना त्यानं केलेली ही धडपड अनेकांना खूप आवडली होती. त्याच्या या मेहनतीची दखल घेत जगभरातून या शिक्षकाला अनेकांनी मदत देऊ केली आहे. घानामधल्या एका भारतीय कंपनीच्या उपकंपनीनं देखील काही कॉम्प्युटर या शाळेल मदत म्हणून देऊन केले आहेत.

एनआयआयटी या कंपनीनं या शाळेला ५ कॉम्प्युटर, एक लॅपटॉप तसेच माहिती व तंत्रज्ञानाशी निगडीत काही पुस्तकांची मदत दिली आहे. ओवूर होतीश असं या घानामधल्या शिक्षकांचं नाव आहे. गेल्या महिन्यात त्याने आपल्या फेसबुकवर फळ्यावर मायक्रोसॉफ्टचे धडे देतानाचा फोटो शेअर केला होता. जो अल्पवधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हजारो लोकांनी तो शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांनी ओवूरला मदत देऊ केली. मायक्रोसॉफ्टनंदेखील ओवूरला मोफत प्रशिक्षण देऊ केलं आहे. नुकताच तो सिंगापूरला मायक्रोसॉफ्टच्या प्रशिक्षण शिबीरात जाऊन आला. सोशल मीडियासारख्या माध्यमात इतकी प्रचंड ताकद असू शकते आणि आपण घेतलेल्या मेहनतीच चीज होऊ शकतं याची कल्पनाही ओवूर यांनी केली नव्हती. या व्हायरल फोटोमुळे शाळेत येणाऱ्या गरीब मुलांचं भविष्य बदललं त्यांना नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळाली याचा आनंदही त्यानं व्यक्त केला आहे.