प्रत्येक व्यक्तीला कशाचा ना कशाचा छंद असतो. हा छंद काहीजण केवळ स्वत:च्या आनंदासाठी जोपासत असतात. त्यात कुठल्याही लाभाची अपेक्षा नसते. बिल्ले, पोस्टाची तिकीटे, कलाकारांची छायाचित्रे, जुन्या गाण्यांच्या रेकॉर्डस, कॅसेटस इत्यादींचा संग्रह करण्याचे छंद बहुतांश वेळा अशा प्रकारात मोडतात. आज आपण पुस्तके, ऑडिओ-व्हिडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, इंटरनेट साईटस यांच्या संकलनाचा खजिना असलेल्या https://archive.org/ या संकेतस्थळाबद्दल आपण जाणून घेउ.

या संकेतस्थळावर लाखोंच्या संख्येने विनामूल्य ई-बुक्स उपलब्ध आहेत. अद्यायावत तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅन केलेली पुस्तके येथे अपलोड केलेली आहेत. त्यामुळे पुस्तकाचे प्रत्येक पान अगदी सुस्पष्ट वाचता येते. अक्षरांचा आकार तुम्हाला आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करून घेता येतो. पुस्तक वाचताना ज्याप्रमाणे आपण एकेक पान उलटतो त्याप्रमाणे येथील पुस्तके आपल्याला वाचता येतील. शैक्षणिक पुस्तके, गोष्टींची पुस्तके तसेच विविध भाषांमधील पुस्तके पहायला मिळतील. येथे प्रोग्रॅमिंग शिकवणारी पुस्तके सापडतील त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचे गीतारहस्य हे पुस्तक देखील वाचायला मिळेल. येथे इंग्रजी पुस्तके वाचण्याबरोबरच ती ऐकण्याची सोय देखील केली गेली आहे.

व्हिडिओ विभागात अनेक जुने चित्रपट, कार्टुन फिल्मस, खेळांच्या क्लिप्स इत्यादी उपलब्ध आहेत.ऑडियोमध्येही अशी विविधता आहे. या संकेतस्थळावर रामायण व महाभारताच्याही ऑडियो क्लिप्स आहेत. तसेच या संकेतस्थळावर वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या महत्वाच्या बातम्या संग्रहित केलेल्या आहेत. बीबीसी व सीएनएन सारख्या शेकडो वाहिन्यांवर गेल्या कित्येक वर्षांत दिल्या गेलेल्या बातम्या या संकेतस्थळावर आपल्याला दृश्य स्वरूपात पाहता येतील. याच बातम्या विषयानुसारही शोधता येतात. या संकेतस्थळावर जुन्या सॉफ्टवेअर्सचाही मुबलक साठा आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम येण्यापूर्वी मायक्रोसॉफ्टची एमएस डॉस (MS-DOS) प्रणाली वापरात होती. यावर खेळले जाणारे खेळ किंवा इतर सॉफ्टवेअर्स कशी होती हे आपल्याला डाऊनलोड करून पाहता येतील. संगणकाच्या आणि इंटरनेटच्या प्रवासात डिजिटल माध्यमात जे कार्यक्रम, साईटस, माहिती विविध टप्प्यांवर उपलब्ध होती ती जिज्ञासू आणि अभ्यासू लोकांसाठी साठवून वापरास विनामूल्य खुली करण्याचा उपक्रम https://archive.org/ या संकेतस्थळाने हाती घेतला आहे.