इराणमध्ये महिलांवर आजही अनेक बंधने आहेत. कधी त्यांनी थोडी वेगळी गोष्ट केली की लगेच त्यांच्यावर कायद्याची तलवार उगारण्यात येते. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या डान्सचा व्हि़डियो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यामध्ये या तरुणीने जीन्स आणि काळ्या रंगाचा एक टॉप घातल्याचे दिसत आहे. तिने हिजाब न घालता असे कृत्य केल्याने तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना इराणची राजधानी तेहरान येथे घडली आहे. याठिकाणी राहणाऱ्या या तरुणीला डान्स करायली खूप आवडते. आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी तिने आपले काही डान्स व्हि़डियो रेकॉर्ड केले आणि ते इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्यावर करण्यात आलेल्या या कारवाईचा निषेध म्हणून येथील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या महिला आपल्या डान्सचे व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट करुन आपला निषेध नोंदवत आहेत.

१८ वर्षाच्या मेहेद होजब्री हीचा हा व्हिडियो काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. अनेकांनी तो लाईक केला, मात्र जेव्हा तो इराण पोलिसांपर्यंत पोहचला तेव्हा काहीसे वेगळेच घडले. अशाप्रकारे हिजाब न घालता डान्स केल्याबद्दल पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले. अशाप्रकारे तरुणीला ताब्यात घेतल्याची घटना काही वेळातच सर्वदूर पसरली आणि सर्व स्तरातून त्यावर मोठ्या प्रमाणात टिकाही झाली. मात्र तरीही इराणी पोलीस आपल्या कृतीबाबत ठाम राहीले. तेथील राष्ट्रीय टीव्ही चॅनेलवर हा व्हीडियो प्रसारीतही करण्यात आला. नैतिक निकष तोडल्यामुळे आपण ही कृती केल्याचे पोलिसांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/Bk-Tni2lTvI/

मेहेद हीने आपल्यावरील आरोप मान्य करत आपण हे जाणूनबुजून केले नसल्याचे सांगितले. नैतिक निकष तोडण्याचा आपला उद्देश नव्हता असेही तिने यामध्ये सांगितले आहे. आतापर्यंत तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ३०० हून अधिक व्हिडियो आणि छायाचित्र शेअर केली आहेत. इराणमध्ये फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया साईटसवर बंदी आहे. मात्र काही लोक प्रॉक्सीचा वापर करुन त्या वापरतात.