केरळमधील पलक्कड जिल्ह्यात स्थानिक गावकऱ्यांनी एका हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे पुढे आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर एकच हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचाा शोध सुरु केला आहे.

केरळच्या Silent Valley National Park चे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनी IANS वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली. “या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांचा आम्ही शोध घेऊ. एखाद्या प्राण्याची हत्या करणं गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना पकडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”

जाणून घ्या काय घडलं होतं या हत्तीणीसोबत??

केरळच्या पलक्कड जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं. हा धमाका इतका मोठा होता की हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं. अशाही परिस्थितीत तिने एकाही व्यक्तीला इजा पोहचवली नाही. एकही घर तिने तुडवलं नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली.” मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडला आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिलं असेल असा अंदाज मोहन क्रिश्नन यांनी व्यक्त केला आहे.

वाचा सविस्तर – फटाक्यांनी भरलेलं फळ खायला दिल्यामुळे गर्भवती हत्तीणीचा मृत्यू, केरळमधील संतापजनक प्रकार