आपल्याला गॅसेस झाले तर चारचौघात आपले स्वत:वर नियंत्रण राहत नाही. मग वास आला की सगळेच जण एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहतात. यामुळे येणारा दुर्गंध आजुबाजूला असणाऱ्या सगळ्यांनाच त्रासदायक असतो. मग असे नेमके कोणी केले याबाबत तर्कवितर्क लावले जातात. मग सार्वजनिक ठिकाणी ज्यांना प्रत्यक्ष गॅसेसचा त्रास आहे त्यांना लक्ष्य केले जाते. मात्र आता त्या व्यक्तीचा आणि इतरांचाही त्रास काही प्रमाणात वाचणार आहे. हा वास रोखणारी जीन्स सध्या बाजारात आली असून ती घातल्याने हा वास जीन्सच्या बाहेर जाऊ शकणार नाही. आता यामध्ये असे कोणते तंत्रज्ञान वापरले आहे ज्यामुळे पादल्याचा वास रोखला जाईल.

तर या जीन्समध्ये कार्बन बॅक पॅनेल लावण्यात आले आहे. त्यामुळे पादल्यानंतर निघणारा दुर्गंधी वायू जीन्समध्येच अडकतो. एखादी व्यक्ती साधारणपणे दिवसातून १४ वेळा पादते. हा आकडा लक्षात घेऊन या जीन्सची रचना करण्यात आली आहे. श्रेडीज या अमेरिकन ब्रँडने पुरुष आणि महिलांसाठी ही जीन्स तयार केली असून गॅसेसचा त्रास असणाऱ्यांसाठी ती अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या जीन्सचे कापड एखाद्या फिल्टरप्रमाणे काम करणार आहे. मात्र त्यामुळे तुम्हाला गॅसेसचा त्रास असेल तरी कोणत्याही अडचणीशिवाय तुम्ही गॅसेस सोडू शकता. या जीन्समध्ये असलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याची किंमत काहीशी जास्त असेल असेही कंपनीने सांगितले आहे. ७ वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध असलेल्या या जीन्सची टॅगलाईनही ‘आत्मविश्वासाने पादा’ अशी आहे.