करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. राज्यातही आजही शाळा, कॉलेज बंद आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या कारणासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळांनी ऑनलाईन वर्गांना सुरुवात केली आहे. शहरी भागांत इंटरनेट आणि इतर सोयी-सुविधांमुळे विद्यार्थ्यांना फारशा त्रासाला सामोरं जावं लागत नाही. परंतू ग्रामीण भागात आजही अनेक विद्यार्थ्य्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी होणारा खर्च परवडत नाहीये. तरीही अनेक शाळा यावर मात करत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे विविध उपाय शोधत आहे. महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्यातील धाडगाव या भागात मोबाईल रेंजच्या समस्येमुळे चक्क झाडावर मुलांची शाळा भरते आहे. ANI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील अनेक भागांत मोबाईल टॉवर पोहचले नसल्यामुळे मोबाईल रेंजला प्रॉब्लेम येतो. गावातील काही ठराविक भागांत रेंज येते. पण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या कारणासाठी एका व्यक्तीने गावातील एका टेकडीवर असलेल्या झाडावर मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांमध्ये स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या सोयी-सुविधेची मोठी समस्या आहे. पण अशा परिस्थितीतही काही शिक्षक मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे.