पूर्वजन्माच्या कथा तुम्ही अनेकवळा ऐकल्या असतील. परंतु, वास्तवातील अशा एखाद्या घटनेविषयी तुम्ही ऐकले आहे का? असेच एक प्रकरण समोर आले आहे. थायलंडमधील एका व्यक्तीने पाळलेल्या सापासोबत विवाह केला असून, त्याच्या लग्नाचे कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. आपली मृत गर्लफ्रेण्ड कोब्राच्या रुपाने पुन्हा आपल्या आयुष्यात आली असल्याचे त्याचे मानणे आहे. तो आणि १० फूट लांबीचा कोब्रा रोज टीव्ही पाहतात, पिकनिकला एकत्र जातात, कॅरम खेळतात आणि जिममध्येदेखील एकत्र जातात.

त्याच्या गर्लफ्रेण्डचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याचे माध्यमातील वृत्तात म्हटले होते. मरण पावलेल्या आपल्या गर्लफ्रेण्डने कोब्राच्या रुपाने दुसरा जन्म घेतल्याचे त्याचे मानणे आहे. कोब्रासोबत तो आनंदाने नांदत असल्याचे दोघांच्या एकत्रित छायाचित्रावरून दिसून येते. आपण या सापाशिवाय राहू शकत नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो जेथे जातो तेथे सापाला बरोबर घेऊन जातो. झोपतानादेखील तो त्याच्यासोबतच झोपतो. अनेकांनी कोब्रासोबत राहण्याच्या धोक्यांबाबत त्याला समजावून सांगितले असले तरी त्याने यागोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे. असे असले तरी कोब्रासोबतच्या राहण्यामुळे परिसरात तो चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

याआधीदेखील सापाशीनिगडीत एक प्रकरण समोर आले होते. एक नागीण रात्रभर आपल्याला लपेटून झोपत असल्याचा अजब दावा कोमल नावाच्या २६ वर्षीय तरुणाने केला होता. गेल्या पाच वर्षांपासून हा किस्सा सुरू आहे. नागीण रोज रात्री या तरुणासोबत झोपते आणि त्याच्या शर्टावर चुंबनाचे निशाणदेखील सोडते. ती कोमलची पूर्वजन्मीची पत्नी असून, पूर्वजन्मातील अधुरी प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी या जन्मी ती नागिणीच्या रुपात अवतरली, असे सांगितले जाते. हे प्रकरण समोर येताच कोमलच्या घरी बघे गर्दी करत आहेत.