भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या २-० ने आघाडीवर आहे. लोकेश राहुलचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर साथीदारांनी दिलेली उत्तम साथ, तसेच भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा हे संघाच्या विजयाची प्रमुख वैशिष्ट्य ठरली. मात्र हा सामना संपल्यानंतर संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनला आहे.

प्रत्येक सामना संपल्यानंतर चहल आपल्या मजेशीर शैलीत Chahal TV या कार्यक्रमात आपल्या सहकारी खेळाडूंची मुलाखत घेत असतो. यादरम्यान खेळाडूंने अनेक किस्से समोर येतात. दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील मैदानावर गप्पा मारत उभे होते. चहलने नेहमीच्या शैलीत हातात माईक घेत, गप्टीलला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला….यावेळी गप्टीलनेही चक्क हिंदीत युजवेंद्र चहलची फिरकी घेतली. पाहा काय म्हणाला मार्टीन गप्टील…

मार्टीन गप्टीलच्या या प्रश्नानंतर रोहित शर्मालाही हसू आवरलं नाही. युजवेंद्र चहलने यानंतर बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, सलामीवीर लोकेश राहुलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३३ धावांचं आव्हान भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ७ गडी राखत भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने दोन तर इश सोधीने १ बळी घेतला, मात्र भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण त्यांना जमलं नाही.