खरेदी आणि महिला हे एक अनोखेच गणित आहे. बाजारात गेल्यावर वस्तू दिसल्या आणि महिलांनी त्या खरेदी केल्या नाहीत असे फार कमी वेळा घडते. पण हे खरेदी करणे काहीवेळा इतके महागात पडू शकते याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. मॉरिशसच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना या खरेदीमुळे आपलं राष्ट्रपतीपद गमवावं लागणार आहे. पुढच्या आठवड्यात त्या आपला राजीनामा देतील. आता इतकं काय झालं की या महिला राष्ट्रपतींवर थेट राजीनामाच देण्याची वेळ यावी.

तर अमीना गुरीब फकीम नाव असलेल्या या राष्ट्रपतींनी एका स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर खरेदीसाठी केला. या आरोपानंतर त्यांच्यावर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एकाएकी इतका मोठा निर्णय घेण्यामागे सरकारचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांनी केलेल्या कृतीमुळे सरकारने त्यांना राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनॉथ यांनी सांगितले. त्यामुळे एक खरेदी या राष्ट्रपतींना किती महागात पडू शकते हे आपल्याला दिसून येईल.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, फकिम या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका असून २०१५ मध्ये त्या राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या मॉरिशसमधील पहील्या महिला राष्ट्रपती ठरल्याने त्यांचे सर्वच स्तरातून मोठे कौतुकही करण्यात आले होते. मात्र आता त्या खरेदीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अमीना गुरीब फकीम इटली आणि दुबईच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी लाखो रुपयाची वेगवेगळ्या वस्तुंची खरेदी केली. त्यांची ही खरेदी ड्यूटी फ्री असून, त्यांनी प्लॅनेट अर्थ इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेच्या क्रेडिट कार्डचा वापर केला आहे असा आरोप करण्यात आला आहे. मात्र अमीना गुरीब फकीम यांनी हा आरोप फेटाळला आहे.