इराक आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमधले संबंध हे वैमन्यस्याचे आहेत. याच वैमन्यस्यामुळे ‘मिस इराक’ हा किताब पटकावणाऱ्या सौंदर्यवतीवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. सराह इदान असं या सौंदर्यवतीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ‘मिस युनिर्व्हस’ स्पर्धेदरम्यान सराहने ‘मिस इस्रायल’ अदर गँडेल्समनसोबत फोटो काढला. हा फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. शांतता आणि प्रेमाचा संदेश देण्याच्या उद्देशानं दोघींनी फोटो काढला होता. पण, याचमुळे सराह आणि तिच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागल्याचं ‘मिस इस्त्रायल’ अदर गँडेल्समननं एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सराहनं आपल्या शत्रू राष्ट्रातील महिलेसोबत काढलेला फोटो त्वरित सोशल मीडियावरून हटवावा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशा धमक्या सराहाला येत असल्याचं ‘मिस इस्त्रायल’ अदर ‘टाइम्स ऑफ इस्त्रायल’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. सराहनं देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्याही धमक्या येत असल्याचं अदरनं वृत्त्वाहिनीला सांगिलतं. सराहाच्या कुटुंबियांनी देश सोडला असून जोपर्यंत हा वाद निवळत नाही तोपर्यंत सराह आणि तिचे कुटुंब परतणार नाही. पण, असं असलं तरी अनेकजण सराहच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. सराह आणि अदरनं कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत, याउलट या दोघींनी प्रेम, मैत्री, सलोख्याचा संदेश दिला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे.