बऱ्याच मुलींना, महिलांना आपण हिल्स असलेल्या सँडल्स, चपलांशी झगडताना पाहतो. काहींना हिल्स घातल्याने त्रास होतो, तर काही जणी चालूच शकत नाही. बऱ्याचदा तर तोलही जातो. पण ही मुलगी काहीशी वेगळी आहे. ही मुलगी हिल्सचे सँडल्स घालून फक्त चाललीच नाही, तर चक्क फुटबॉलसोबत खेळली आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. तुम्ही पाहिला का?

मिझोरममधली सिंडी रेमरौतपुई ही मुलगी फुटबॉलची खेळाडू आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फुटबॉलसोबत खेळत आहे. यावेळी तिने हिल्सचे काळ्या रंगाचे सँडल्स घातले आहेत आणि आपल्या पायावर ती फुटबॉल सांभाळत ती त्याच्यासोबत खेळत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं यातलं कौशल्य एवढं आहे की हा फुटबॉल एकदाही जमिनीला टेकलेला नाही.


सिंडी सघ्या दहावीत आहे. तिने आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. फुटबॉल क्षेत्रातला नामांकित असा सुब्रोतो कपही तिने जिंकला आहे. सिंडी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे धडे गिरवत आहे. सध्या इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या कौशल्याचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा- Video : …आणि फिल्डर बाउंड्री लाईनच विसरला! नक्की काय घोटाळा झाला!

तिचा हा व्हिडिओ मिझोरमचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनीही आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. त्याचबरोबर तिचं कौतुकही केलं आहे.


इंडियन एक्सप्रेसने सिंडीशी संवाद साधला असता तिने सांगितलं की, फुटबॉल हा फक्त मुलांचा खेळ नसून तो मुलं-मुली कोणीही खेळू शकतं हेच आपल्याला दाखवून द्यायचं आहे. इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण असे व्हिडिओ करुन अपलोड करत असल्याचंही सिंडीने सांगितलं.