News Flash

Mother’s Day Open Letter: आई तू सोशल नेटवर्किंगवर आली अन्…

नव्यानेच सोशल नेटवर्किंगवर आलेल्या, गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेजचा पाऊस पाडणाऱ्या लाडक्या आईला लिहिलेले हे ओपन लेटर...

प्रातिनिधिक फोटो

(नव्यानेच सोशल नेटवर्किंगवर अ‍ॅक्टीव्ह झालेल्या आपल्या लाडक्या आईला ‘मदर्स डे’निंमित्त लिहिलेले हे ओपन लेटर…)

प्रिय आईस,

मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा…

आता तू म्हणशील, ‘हे काय?’

तर तुला एवढचं सांगेल की संकष्टी आणि अंगारकीच्या शुभेच्छा देणाऱ्या तुमच्यासारख्या नवख्या खेळांडूंना आजच्या दिवशी अशा डिजीटली शुभेच्छा देणं खूप महत्वाचं आहे. नाही गं टिंगल नाही करतय मी तुझी. पण खरचं तुम्ही म्हणजे तू, बाबा, नाना आजोबा, काकू, तुझ्या मैत्रिणी सगळे जण मागील काही महिन्यांमध्ये स्मार्टफोन घेत या आमच्या डिजीटल दुनियाचे सदस्य झालात. मग अगदी फेसबुक, ट्विटर, युट्यूब, व्हॉटसअ‍ॅप असो किंवा अगदी स्नॅपचॅटपर्यंत तुम्ही एकदम भराभर प्रगती केली याचा आनंदच आहे. आणि हा आनंद जास्त मेमोरेबल आहे कारण तुम्ही ज्या चुका केल्यात, जे प्रश्न विचारले त्यापैकी अनेक प्रश्न हे एकदमच आऊट ऑफ द बॉक्स आणि हास्यास्पद होते. म्हणजे व्हॉट्सअप स्टोरीज चेक करताना ‘तुला तीने हे फोटो का पाठवले’ हा डिटेक्टीव्ह टाइप प्रश्न असू देत किंवा हे पोस्टवर हार्ट केलं म्हणजे काय केलं रे? किंवा चेकइन करतात म्हणजे नक्की काय करतात? या सारखा आम्हाला गोंधळात टाकाणारा प्रश्न असू दे. अनेक प्रश्नांचा पाऊसच पाडलात तुम्ही. पण यासर्वांमधून तुम्ही जे शिकलात ते खूप फास्ट अंमलात आणलतं तुम्ही याचं विशेष कौतूक आहे. ती लहान मुलं नाही का प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी त्या गोष्टीकडे बोट दाखवून ‘हे ताय ऐ?’ असे बोबड्या स्वरातले प्रश्न विचारतात तसेच तुम्ही विचारलेले हे प्रश्न वाटतात. त्या बोबडेपणातील क्यूटनेसची जागा तुमच्या क्यूट अशा इनोसन्सने घेतलेली असते इतकंच.

तुमच्या या नव्यानेच डिजीटल झालेल्या पण जुन्या पिढीची सर्वात खटकणारी गोष्ट म्हणजे तुम्ही न पाहता करणारे फॉर्वडेड मेसेजेस. आई आठवतंय तुला आपण कितींदा वाद घातलाय यावरून. तू पाठवलेले हा मेसेज १० जणांना पाठवापासून ते भारताचे राष्ट्रगीत युनिस्कोने सर्वोत्तम राष्ट्रगीत म्हणून निवडलेय पर्यंतचे सगळे मेसेजेस आपल्या घरातील शीत युद्धांमध्ये तेल ओतत गेले आणि त्यादिवशी अगदी तू एकदम भांडता भांडतो बोललीस की नाही आवडतं माझे मेसेजेस तर ब्लॉक करं ना मला किंवा काढून टाक तुझ्या फेसबुकवरून (अनफ्रेण्ड हेही तू आत्ता कुठे शिकलीयस तेव्हा तुला तेही ठाऊक नव्हतं असो) त्यावेळेस तू मला ब्लॉक बिक करायला सांगितलं म्हणून दुखी: होऊ की तुझं ज्ञान इतकं वाढलंय म्हणून आनंद व्यक्त करु कळतचं नव्हतं.

आणि प्लीज प्लीज प्लीज एक काम करं ना ते गुड मॉर्निंगवाले मेसेजेस फॅमेली ग्रुपवर टाकणं बंद करं ना. म्हणजे तुला मी सांगून सांगून थकलोय की नसतो कोणालाच इंट्रेस्ट सुर्यफुलाच्या पाकळ्यांवर लिहीलेलं शुभप्रभात किंवा हसणाऱ्या सुर्याखाली लिहीलेलं गुड मॉर्निंग टेक्स्ट वाचण्यात. त्यात तू हे सगळं आपल्या कॉमन ग्रुप्सवर तर पाठवतेसच पण पर्सनलवर पण पाठवतेस. म्हणजे का असं करतेस तू हे मला अद्याप कळलं नाही. आणि विचारलं तर तुझं ठरलेलं उत्तर, ‘नाही पाहायचंय तर नको ना डाऊनलोड करूस’ आता हे असं तिरकं उत्तर दिल्यावर कोण काय आणि कशासाठी बोलेल ना तुझ्या या सकाळ दुपार न संध्याकाळ आणि रात्री पडणाऱ्या गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून आणि गुड नाईट मेसेजेसबद्दल. यात तुझी आणि आत्याची अचूकता एवढी आहे ना ठरलेल्या वेळेला मेसेज यायची की विचारता सोय नाही. म्हणजे तुम्हाला डॉक्टरने वगैरे गोळ्याऐवजी या या वेळी मेसेजेस ग्रुपवर टाका असं सांगितलंय की काय शंका वाटावी इतकी नियमीतता यामध्ये आहे.

लहानपणी तू मला बोटांना धरुन चालायला शिकवलं. आज बोटे टचस्क्रीनवर कशी फिरवावीत हे मी तुला तुझे बोट पकडून शिकवतं आहे. पण या तुझ्या नवीन इंनिंगला पाठिंबा देताना अनेकदा तू मलाच गुगली टाकतेस, हे तुला समजतंय की नाही ठाऊक नाही पण हे होतंय हा असं. अगं म्हणजे मी एखाद्या मैत्रिणीच्या फोटोवर लव्ह यू म्हटलं तर त्यावरून घरात चर्चा झालीच पाहिजे असं काही नाहीय ना. पण आपल्याकडे मी एखाद्या पोरीच्या फोटोवर लव्ह म्हणजे तुझ्या भाषेत हार्टवालं रिअ‍ॅक्ट झालो तरी चर्चा का होतं कळतं नाही. बघं आई आज माझे असे अनेक मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी आपल्या आई-बाबांना जस्ट ते इरिटेट करतात म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्सवर फ्रेण्ड करुन घेतलेलं नाहीय. कारण अस केल्यास त्यांच्या स्वैराचारावर नजर ठेवणारं कोणीतरी आहे तिथे असं होतंय. पण मी चुकीचं काही करतचं नसल्याने उगचं तुला ब्लॉक करा, हाईड करा असं कधीच काही केलंय नाहीय. मला ठाऊक आहे आपल्यात सोशळ मिडीयावरील पोस्टवरून वाद होत असतात पण मी खरा कसा आहे हे तुला ठाऊक आहे. म्हणजे मी चारचौघात शिव्या देतो हे तुला ठाऊक आहे. पण मग तेच मी सोशल नेटवर्किंगवर व्यक्त झाल्यावर तू का गं चिडतेस. असू देत मी मला मी आहे तसा ऑनलाइन आणि ऑफलाइन पण. कधीतरी वाटतं इतरांसारखं तुझ्यापासून लपवावं बरंच काही पण मग वाटतं की माझी पहिली बेस्ट फ्रेण्ड असणारी माझी सुपरवूमन मला समजून घेण्यात आत्तापर्यंत कमी पडली नाही ती या सोशल मिडियाच्या जगात कशी कमी पडेल ना. म्हणूनच मी तुला कधी ब्लॉक केलं नाही किंवा इतर फ्रेण्ड्स आपल्या आई-बाबांना कळू नये म्हणून चेक इन करताना ‘अरे टॅग मत करं मेरे बाप को मालूम नही है कमी मैं इधऱ हैं. और वो फेसबुक पे है.’ असं सांगतात सरळ सरळं. हे असले काही एफर्स्ट मी कधी घेतले नाही आणि घेणारही नाही. कारण आपलं वेगळंय..!!! हो की नाही?

असो पुरे झाले आता. तुझ्या मैत्रिणींच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर मेसेजसचा पूर आलं बघं तू माझं हे पत्र वाचता वाचता. जा जा त्यांना तुझ्या एखाद्या फॉर्वडेड मेसेजची गरज असेल. बाकी अशी ठग लाइप म्हणतात त्या प्रकराप्रमाणे माझ्या स्टेटसवर घरात समाचार घेते तशा कमेन्ट्स करत राहा. कारण त्या माझ्यापेक्षा माझ्या मित्रमंडळींना जास्त आवडतात. तू प्रचंड लोकप्रिय आहेस माझ्या फ्रेण्डसर्कलमध्ये जस्ट बिकॉज ऑफ यूआर कमेन्टस ऑन माय पोस्ट्स बरं का आई.

जाता जाता एवढचं सांगेल प्रश्न विचारत राहा, वाद घालतं राहा, चुका करतं राहा आणि सोशल नेटवर्किंग एन्जॉय करं कारण तु माझं बालपण एन्जॉय केलंय तसंच मी हे तुझं डिजीटल विद्यार्थीनी असणं एन्जॉय करतोय. परत एकदा मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आई…

कळावे,

– तुझाच
अबक

– स्वप्निल घंगाळे
(swapnil.ghangale@loksatta.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 2:37 am

Web Title: mothers day special letter mother who came on social networking site scsg 91
टॅग : Mothers Day
Next Stories
1 तुमच्या साध्या टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’, Xiaomi ने लॉन्च केलं भन्नाट डिव्हाइस
2 PUBG Mobile साठी नवीन अपडेट, शानदार फीचर्समुळे अजून वाढली गेमची मजा
3 ‘करोना हेल्पलाइन’पेक्षा मद्यासाठी गुगलवर झुंबड