ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कोणत्या ऑफर किंवा फ्रॉडमुळे नाही तर एका ग्राहकाला दिलेल्या रिप्लायमुळे कंपनी चर्चेत आली आहे. फ्लिपकार्टचं सोशल मीडिया हँडल वापरणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं चक्क नागालँड भारतात नसल्याचा रिप्लाय एका ग्राहकाला दिला. त्यानंतर फ्लिपकार्टविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन डे या सेलनिमित्त एक जाहिरात देण्यात आली होती. यावर एका कोहिमा येथे राहणाऱ्या एका ग्राहकांनं तुम्ही नागालँडमध्ये वस्तू का पोहोचवत नाहीत असा सवाल फ्लिपकार्टला केला. त्यावर फ्लिपकार्टनं नागालँड भारतात नसल्यानं सेवा पुरवता येणार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांच्या या रिप्लायवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. “आम्ही अजूनही स्वतंत्र झालो नाही. सर्व राज्यांना एकसारखी वागणूक द्या,” असं म्हणत त्या युझरनं फ्लिपकार्टला सुनावलं.


काय म्हटलं होतं फ्लिपकार्टनं?

ग्राहकापर्यंत वस्तू न पोहोचण्याबाबत फ्लिपकार्टनं क्षमा मागितली. “असं होण्यासाठी क्षमस्व. फ्लिपकार्टवरून वस्तू खरेदी करण्यास रस दाखवल्याबद्दल धन्यवाद. विक्रेते भारताबाहेर सेवा देत नाहीत,” असं कंपनीनं म्हटलं. परंतु चूक लक्षात आल्यानंतर कंपनीनं तो रिप्लाय डिलीट केला. परंतु तोवर त्या मेसेजचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता. तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांनी फ्लिपकार्टवर टीका केली. “आमच्या भविष्याची भविष्यवाणी करण्यासाठी आणि लवकर आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फ्लिपकार्टचे धन्यवाद,” असं ट्वीट सुप्रसिद्ध नागा संगीतकार अलबो नागा यांनी केली.