वयस्कर पुरुषांना आपल्या वयापेक्षा बऱ्य़ाच कमी म्हणजे तरुण मुली आवडतात असे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पण हे पुरुष शारीरिकदृष्ट्या केवळ तरुण मुलींकडेच आकर्षित होतात असे नाही, तर ज्येष्ठ महिलाही त्यांना आकर्षित करण्यास पुरेशा असतात. याचा अर्थ वयस्कर पुरुषांना त्यांच्या विसाव्या वर्षात आवडणाऱ्याच मुली आवडतात असे नाही. तर या पुरुषांचे वय ४०, ५० किंवा ६० वर्षे झाले तरी त्यांना २० ते २२ वर्षे वयाच्या तरुणी आवडतात. त्यामुळे पुरुषांना तरुण मुलींचे विशेष आकर्षण असते असे या अहवालातून स्पष्ट होते.

फिनलँडमधील अबो अकादमी विद्यापीठात हा अभ्यास करण्यात आला असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे निष्कर्ष नोंदविण्यात आले आहेत. जगात बहुतांश जोडप्यांमध्ये पुरुष हे महिलांपेक्षा वयाने मोठे किंवा महिलांच्या वयाइतकेच असतात अशीही नोंद या अभ्यासाव्दारे करण्यात आली आहे. हा अभ्यास प्रसिद्ध लेखक जॅन अँटफ्लोक यांनी आणि त्यांच्या टीमने केला असून त्यासाठी त्यांनी २६५५ प्रौढांचा अभ्यास केला आहे. अँटफोल्क म्हणतात, जेव्हा लिंगभेदाबद्दल विषय निघतो, तेव्हा एखाद्या पुरुषाने आपल्यापेक्षा कमी वयाच्या महिलेची निवड केली तर आपण समजू शकतो कारण उत्क्रांतीच्या सिद्धांतात ते बसणारे असते. पण अनेकदा पुरुषांची शारिरीक गरज जोपर्यंत अधिक तीव्र होत नाही तोपर्यंत ते जोडीदाराचा शोध घेत नाहीत. त्यातही पुरुषांना आपले वय जास्त असले तरीही कमी वयाच्या महिला आवडतात. पण २० वर्षे वयाच्या मुली आवडत असल्या तरीही त्यांच्यासोबत ते शारीरिकदृष्ट्या समाधानी होतीलच असे नाही असेही या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.