मास्क घालूनच घराबाहेर पडणं हे आता सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भागच झालं आहे. अनेक शहरांमध्ये मास्क घातलं नसेल तर दंड आकारला जातोय. त्यामुळेच मास्क घालूनच घराबाहेर पडण्याला अनेकजण प्राधान्य देता असल्याचे दिसत आहे. एकीकडे सार्वजनिक आरोग्यासाठी मास्क घालणं महत्वाचं असलं तरी याच मास्कमुळे पाकिस्तानमधील पेशावर शहरातील एका व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. आता तुम्ही म्हणाल मास्क घातल्याने या व्यक्तीला का तुरुंगाची हवा खावी लागली. तर या व्यक्तीने घातलेलं मास्क हे करोना संरक्षणासाठीचं नव्हतं तर ते एक वुल्फ मास्क म्हणजेच भयपटांमध्ये दाखवतात त्याप्रमाणे लोकांना घाबरवण्यासाठी घातलेलं वुल्फ मास्क होतं.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी थोडी गंमत करावी म्हणून पेशावरमधील रस्त्यावर हा तरुण हे वुल्फ मास्क घालून फिरत होता. अनेकांसमोर अचानक प्रकट होऊऩ त्यांना घाबरवण्याचा या तरुणाचा प्रयत्न सुरुवातीला यशस्वीही झाला. मात्र काही वेळातच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. पाकिस्तानमधील पत्रकार ओम आर कुरेशी यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली आहे. कुरेशी यांनी अटक करण्यात आलेल्या या तरुणाचा फोटोही पोस्ट केला आहे. फोटोमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्यामध्ये हा तरुण वुल्फ मास्क घालून उभा असल्याचे दिसत आहे. या तरुणाच्या हातामध्ये बेड्या घालण्यात आल्यात.

पेशावरमधील पोलिसांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच संध्याकाळी एका तरुणाला अटक केली. हा तरुण मास्क घालून लोकांना घाबरवत होता, असं कुरेशी यांनी या फोटोला दिलेल्या कॅफ्शनमध्ये म्हटलं आहे.

यावर आता नेटकरी मजेदार प्रतिक्रिया देत असून या आरोपीच्या प्रँकवरुन आता त्यालाच ट्रोल करत आहेत.

१) हा असा झाला बदल

२) नवीन वर्ष आहे हॅलोवीन नाही

३) मास्क घातल्याचं समाधान

४) वुल्फलाही आदर देत नाहीत

५) बिचाऱ्याला का पकडलं?

एकंदरितच या तरुणाने प्रँकमुळे लोकांना घाबरवलं की नाही ठामपणे सांगता येणार नाही पण पोलिसांनी त्याला अटक केल्याचा फोटो पाहून नेटकरी मात्र खूपच हसलेत हे रिप्लायवरुन दिसून येत आहे.