राग आल्यावर कोण कधी काय करेल सांगता येत नाही. यातही वाहतुकीच्या नियमांबाबत कायमच काही ना काही घडत असते. वाहतुकीचे नियम हे जणू मोडण्यासाठीच असतात असा समज असणाऱ्यांना काही पादचाऱ्यांनी नुकतीच अद्दल घडवली. तीही अतिशय वेगळ्या स्वरुपात. आता त्यांनी असे काय केले ज्यामुळे ड्रायव्हरला अद्दल घडली तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एका कारच्या बोनेटवर चढत या पादचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला.

रस्त्यात अनेकदा वाहतुकीवरून चालकांमध्ये जुंपलेली दिसते. याबाबत कितीही जगजागृती झाली तरीही नियम मोडणारे काही महाभाग असतातच. अशाचप्रकारे नियम मोडत आपली कार झेब्रा क्रॉसिंगवर उभी करणाऱ्या एका ड्रायव्हरला पादचाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला. कार झेब्रा क्रॉसिंगवर उभी केल्याने आपल्याला रस्ता क्रॉस करण्यास अडचण होत आहे, हे दाखविण्यासाठी या पादचाऱ्यांनी थेट गाडीच्या बोनेटवर चढूनच रस्ता क्रॉस केला.

हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून, तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. हे नेमके कुठे घडले ते सांगता येत नसले तरीही ड्रायव्हरला त्याची चूक लक्षात आणून देण्याची एक पद्धत असल्याचे दिसते आहे. सुरुवातीला एक महिला आणि पुरुष झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या या गाडीच्या बोनेटवरुन चालत गेले. त्यानंतर त्यांच्यामागून येणाऱ्या आणखी तीन महिलांनीही असेच केले. त्यानंतर ड्रायव्हरला त्याची चूक लक्षात आल्याने त्याने कार मागे घेण्यास सुरुवात केल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते.