अमेरिकेमधील सॅन फ्रान्सिस्कोमधील महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. येथील स्थानिक बाजार परिसरामध्ये बे ब्रिजसमोर असणाऱ्या महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या डोळ्यांमध्ये एलईडी लाइट लावण्यात आले. संध्याकाळच्या सुमारास या पुतळ्याच्या डोळ्यांमधून लाल रंगाचा प्रकाश बाहेर पडत असल्याचे पाहून स्थानिकांना आश्चर्य वाटले. नंतर येथील काही प्रॅक करणाऱ्यांनी महात्मा गांधीच्या या ब्रॉझपासून बनवण्यात आलेल्या पुतळ्याच्या डोळ्यात एलईडी लाइट लावल्याची माहिती समोर आली आहे.

गांधी मेमोरियल इंटरनॅशनलने १९८८ हा पुतळा उभारला आहे. आतापर्यंत अनेकदा या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. एकदा या पुतळ्याचा चष्मा चोरण्यात आला होता. तेव्हापासून या शहरामधील पुतळ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी असणाऱ्या कला आयुक्तांनी पुन्हा कधी पुतळ्यांच्या डोळ्यांवरील चष्मा चोरीला गेल्यास अडचण येऊ नये म्हणून अधिकचे चष्मे बनवून घेतले आहेत. मात्र यावेळी पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांनी चष्मा काढून नेण्याऐवजी या पुतळ्यावर डोळ्यांमध्ये एलईडी लाइट्स लावल्या. त्यामुळे संध्याकाळी अचानक या पुतळ्याचे डोळे लाल रंगात चमकू लागले.

रेडीटवर या चमकणारे डोळे असणाऱ्या गांधीच्या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाले. विकी वन टाइम नावाच्या प्रोफाइलवरुन हे फोटो शेअर करण्यात आले होते. ‘हे पाहून विस्टन चर्चील यांना भिती वाटली असती’ असं हे फोटो शेअर करताना विकीने म्हटलं आहे.

दुसऱ्या एका व्हायरल फोटोमध्ये एक तरुण या पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढून गांधींच्या पुतळ्याला एलईडी लाइट्स लावताना दिसत आहे.

हे फोटो रेडइटवर व्हायरल झाल्यानंतर ते फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले. काहींनी पुतळ्याची तोडफोड करण्याऐवजी त्याला डोळे लावणाऱ्यांच्या बाजूने मत मांडले आहे तर काहींनी या कृत्याचा निषेध केला आहे.