ससा किती चपळ असतो याबाबत आपण अनेकदा ऐकलं असेल. पण आता तुम्ही चपळ सशाची चतुराईही पाहा. न्यूझीलंडच्या मेंढपाळाने एक फोटो शेअर केलाय जो सध्या सोशल मीडियारवर व्हायरल होत आहे. पुरामुळे सर्वत्र पाणी साचलं होतं, चिखलही होता. इथला एक मेंढपाळ मेंढ्यांच्या कळपांना घेऊन चरायला गेला होता. पण घरी परताना मात्र पुराच्या पाण्यामुळे त्याला खूप अडचणीही येत होत्या. चिखलाने मेंढ्यांचे पाय अगदी माखले होते. निसरड्या वाटेवरून एकमेकांना चिटकून मेंढ्या एका वाटेनं चालल्या होत्या. तेव्हा या मेंढपाळाला एक वेगळंच दृश्य दिसलं. कळपात मधोमध चालणाऱ्या दोन मेंढ्या काहिशा वेगळ्या दिसत होत्या.

त्याला सुरुवातीला काही समजलं नाही. पण त्याने नीट निरखून पाहिलं तेव्हा त्याला एक अजब प्रकार दिसला. या मेंढ्यांच्या पाठीवर तीन ससे बसले होते. पुराच्या पाण्यातून स्वत:ला वाचवण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांनी मेंढ्यांचा आधार घेतला होता. एका मेंढीच्या पाठीवर एक तर दुसऱ्या मेंढीच्या पाठीवर दोन ससे आरामात बसले होते. हे ससे मेंढीच्या पाठीवर चढले कसे याचं उत्तर शेवटपर्यंत काही त्याला मिळालं नाही. आपल्या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही हेही त्याला माहिती होतं म्हणून त्याने या सशाचे फोटोही काढले.
फ्रेग असं या मेंढपाळाचं नाव आहे. पंधरा वर्षांचा असल्यासून तो मेंढ्या पाळत आहे. पण गेल्या पंच्चावन वर्षांपासून असा प्रकार आपल्याला कधीही पाहायला मिळाला नाही असंही ते म्हणाले.