सोशल मीडियाच्या वाढत्या वापरापासून देशातील पोलीस व्यवस्था देखील आता दूर राहिलेली नाही. बऱ्याच शहरांमधील पोलीस त्यांनी केलेल्या कारवाईबाबत ट्विटरद्वारे माहिती देत असतात. मुंबई पोलीस ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असल्याचं अनेकदा पाहण्यात आलंय. विनोदी आणि तितक्याच गंभीर ट्विटमुळे मुंबई पोलीस नेहमी चर्चेत असतात, आता राजस्थान पोलिसांनीही मुंबई पोलिसांच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.


 
राजस्थानच्या अमलीपदार्थ विरोधी शाखेने मोठ्या प्रमाणात Heroin या अमलीपदार्थाचा साठा पकडला.heroin ला स्मॅक असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी याबाबत ट्विट करताना, ‘कुणाचा smack हरवला आहे काय? जर हरवला असेल आणि परत हवा असेल तर आमच्याशी त्वरित संपर्क साधा अन्यथा कायमस्वरुपी गमावून बसाल. Smack घेण्यासाठी परत येणाऱ्याची मोफत राहण्या आणि खाण्यापिण्याची सोय केली जाईल हे आमचं वचन आहे…त्यामुळे त्वरा करा’ असं मजेशीर ट्विट राजस्थान पोलिसांनी केलं आहे.

राजस्थान पोलिसांचं हे ट्विट सोशल मीडियावरील युजर्सच्या पसंतीस पडल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल अशाप्रकारच्या विनोदी ट्विटसाठी सर्वाधिक प्रसीद्ध आहे. काही दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनीही अशाप्रकारचं ट्विट केलं होतं. ‘घाबरू नका, तुमचा हरवलेला गांजा आमच्याकडे आहे’ असं ट्विट आसाम पोलिसांनी 590 किलो गांजा पकडल्यानंतर केलं होतं.