राज्यास्थानमधील उदयपूरमधील एक अजब प्रकरण समोर आलं आहे. गावातील सरपंच आणि पोलिसांनाही या प्रकरणाचा छडा लावता आली नाही. पण या मुक्या प्राण्यानं एका क्षणात हे प्रकरण मिटवलं आणि सर्वांनाच चकित केलं. उदयपूर परिसरात सध्या हा विषय चर्चेचा आहे. प्रत्येकजण चवीनं या प्रकरणाची चर्चा करत आहे. उदयपूरमधील वल्लभनगर तहसील अंतर्गत खेरोदा पोलिस स्टेशनमधील हा प्रकार आहे. येथे एका शेळीचे दोन मालक असल्याचा वाद आला होता. खेरोदा पोलिस स्टेशनमधील आधिकाऱ्यानं दोन्ही मालकांना शेळीच्या करडाला घेऊन उपस्थित राहायला सांगितलं. त्यानंतर शेळीला सोडण्यात आलं. शेळी आपल्या पिलाजवळ (करडू) गेली अन् दुध पाजलं. अशा प्रकारे मुक्या प्राण्यानं अवघड प्रकरण एका क्षणात सोडवलं.

खेरोदा स्टेशनअंतर्गत येणाऱ्या धोलाकोट गावात राहणाऱ्या बाबरु रावत यांची शेळी चंगलात चरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी शेळी हरवली. बाबरु रावतने शेळीला आजूबाजूच्या परिसरात आणि गावात शोधलं. त्यानंतर ४ किमी असणाऱ्या मासिंगपुरा गावात डांगफला येथे शेळी असल्याचं त्याला समजलं. बाबरु आपली शेळी आणण्यासाठी मासिंगपुरा गावात उंकारलाल रावत यांच्या घरी पोहचला. त्यावेळी शेळी तेथेच बांधलेली दिसली. उंकारलाल यांनी ती शेळी माझीच असल्याचं सांगत बाबरुला तेथून हाकलून दिलं.

बाबरु यांनी वेळ न घालवता गावातील पंचाना मदतीसाठी बोलवलं पण काहीच झालं नाही. त्यानंतर बाबरु यांनी शेळीची रिपोर्ट खेरोदा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी पहिल्यांदा दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही ऐकण्यास तयार होईना. अखेरीस शेळी कोणाची हा प्रश्न त्याच मुक्या प्राण्यावर सोडण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पोलीस आधिकाऱ्यानं वादग्रस्त शेळी आणि त्याच्या पिलाला घेऊन येण्यास सांगितलं. बाबरु आणि उंकारलाल जवळ असलेल्या करडाच्या मध्ये शेळीला उभं करण्यात आलं. त्यानंतर शेळीनं बाबरुजवळ असलेल्या पिलाजवळ जाऊन प्रेमानं दूध पाजलं. तर उंकारलालच्या करडाला शिंगानं दूर सारलं. शेळीच्या या न्यायानं उपस्थित सर्वांना चकित केलं. शेवटी पोलिसांनी शेळीला बाबरु यांच्याकडे सोपवलं.