जोडया स्वर्गात बनतात असे म्हणतात. जोडी जुळल्यानंतर परस्पर सामंजस्य आणि प्रेम भावना नसेल तर ते नाते फार काळ टिकत नाही. अशावेळी तुटणारे नाते टिकवण्यासाठी महिलांवर नकळत एक दबाव निर्माण होतो. आज आपण अशी पाच कारणे जाणून घेणार आहोत जी महिलांना नात्यात तडजोड करण्यासाठी भाग पाडतात.

कन्फ्यूजन
रिलेशनशिपमध्ये असताना काही महिला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करुनही आपल्या नात्याबद्दल कन्फ्यूज असतात. मानसोपचार तज्ञांनुसार अशा महिला आपल्याला होणाऱ्या त्रासासाठी स्वत:ला जबाबदार ठरवतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये असलेला आत्मसम्मान हळूहळू हरवत जातो. आपल्या आयुष्याला अर्थ राहिला नाही असे त्या महिलांना वाटते.

समाजाची भीती
अनेकदा महिला समाजाच्या भीतीपोटी हिंसा सहन करतात. नाते तोडत नाहीत. समाज काय म्हणले ही भीती त्यांच्या मनामध्ये असते. अनेकदा महिला त्यांच्या बरोबर होणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल कोणाकडे वाच्यता करायला घाबरतात.

जोडीदार सुधारेल ही अपेक्षा
कमी शिकलेल्या महिलाच अशा नात्यांमध्ये फसत नाहीत. सुशिक्षित शिकलेल्या महिला सुद्धा नाईलाजाने नाते निभावतात. भविष्यात आपला जोडीदार सुधारेल ही एकच भावना त्यामागे असते. जर मी जोडीदाराला सोडले तर त्याचे आयुष्य उद्धवस्त होईल असे या महिलांना वाटते.

मुलांच्या भविष्यासाठी
आपल्या देशात सिंगल पालक बनून मुलांचा सांभाळ करणे खूप कठीण आहे. खासकरुन ती महिला असेल तर तिच्यासाठी ते खूप कठीण असते. अशा परिस्थितीत मुलांचे भविष्य घडवण्यासाठी त्या महिला स्वत:चे आयुष्य अंधारात ढकलतात.

कुटुंबाचा दबाव
आजही आपल्या देशात नाते बनवणे सोपे आणि ते तोडणे कठीण समजले जाते. जर एखाद्या महिलेला पतीसोबत रहायचे नसेल तर कुटुंबातील सदस्य तिला नाते तोडू नको असा सल्ला देतात. अनेकदा कुटुंबातील सदस्य समाज आणि मुलांचे भवितव्य दाखवून पती सोबतचे नाते टिकवण्यासाठी महिलांची समजूत घालतात