गेल्यावर्षी नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये दारूबंदी लागू केली. या निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीस सुरूवात झाली. दारूभट्टया, गुत्ते सगळ्यांवरच बंदी घालण्यात आली. तर पोलिसांनी कारवाई करून काही लिटर दारू जप्त केली. पण खरी अडचणी अशी झाली की कारवाई करून जप्त केलेल्या दारूचं पुढं झालं काय? ही दारू गेली कुठं? आता या प्रश्नाचे उत्तर बिहार पोलिसांनीच द्यायला हवे. पण त्यांच्याचकडे या प्रश्नाचे उत्तर नाही.

पोलिसांनी दारूबंदीच्या काळात जवळपास नऊ लाख लिटर दारू जप्त केली असल्याचे समजते. पण जेव्हा ही दारू नेमकी गेली कुठे याचा हिशेब पोलिसांकडे मागितला गेला, तेव्हा त्यांच्याकडे याचं उत्तर नव्हतं. बरं उत्तर देणं तर भाग होतं, मग काहीतरी ठोकून द्यावं, असं या पोलिसांच्या मनात आलं तर आश्चर्य वाटायला नको. पण पोलिसांनी अशा काही थापा मारल्या की ऐकूनच कोणीही डोक्याला हात लावेल. खोटं बोल पण रेटून बोल हा फंडा काही त्यांना जमला नाही. तेव्हा जप्त केलेली दारू इथल्या उंदरांनी ढोसली, असा जावईशोधच पोलिसांनी लावला.

काही दारूच्या बाटल्या नष्ट केल्या तर काही दारु इथल्या उंदरांनी फस्त केली, अशी भूलथाप त्यांनी मारली. आता ही थाप आहे हे एखादं शेंबडं पोरही सांगेल. तेव्हा अतिरिक्त पोलीस आयुक्त एस के सिंह यांनी आता या प्रकणात अधिक लक्ष घालायचे ठरवले आहे. पाटणाच्या विभागीय अधिकाऱ्याला या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही सिंह यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी बिहार पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष निर्मल सिंह आणि आणखी एकाला अटक केली आहे.