मुंबईच्या समुद्रकिनारी फिरायला येणारे पर्यटक असो किंवा अगदी मुंबईकर, त्यांना येथील समुद्रा इतकंच त्याच्या बाजूलाच असलेल्या मोठमोठ्या इमारतींचंही आकर्षण असतं. त्याला कारण म्हणजे समुद्राच्या बाजूलाच असल्याने गगनाला भिडलेल्या येथील घरांच्या किंमती…खरंच, समुद्रदर्शन मिळणारं मुंबईतलं घर किती रुपयांचं असू शकतं? ऐकून तुमच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकावेत इतकी याची किंमत.

दक्षिण मुंबईच्या ‘अल्टामाउंट रोड’वरील ‘लोढा अल्टामाउंट’ या टॉवरच्या ‘ए विंग’ इमारतीत 2 हजार 952 स्क्वेअर फुटांच्या एका फ्लॅटची नुकतीच विक्री झाली. MSwipe Technologies चे संस्थापक मनिष पटेल यांनी हा फ्लॅट खरेदी केला. यासाठी पटेल यांनी प्रति स्क्वेअरफुट तब्बल 1.29 लाख रुपये मोजले.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, 40 मजली रहिवासी इमारतीच्या 15 व्या मजल्यावर मनिष आणि त्यांची पत्नी शितल यांनी फ्लॅट खरेदी केला असून यासाठी त्यांनी तब्बल 38.08 कोटी रुपये मोजले आहेत. यासोबतच यावर्षी थेट ग्राहकाला विक्री झालेला हा मुंबईतील सर्वात महागडा फ्लॅट ठरला. सध्या केंप्स रोड येथे वास्तव्यास असलेल्या पटेल यांना घर खरेदी केलेल्या इमारतीत त्यासोबत किमान सहा कार पार्क करता येतील इतकी पार्किंग जागाही मिळाली आहे. आपल्या नवीन घराच्या नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशन) पटेल दांपत्याने तब्बल 2.28 कोटी रुपयांची स्टॅप्म ड्युटी भरली.

या टॉवरमध्ये रहिवाशांसाठी चार बेडरुम हॉल आणि किचन, पाच बेडरुम ड्युप्लेक्स आणि पाच बेडरुम व्हिला अशाप्रकारची घरं उपलब्ध आहेत. याशिवाय इतर आवश्यक सर्व सोयीसुविधा देखील टॉवरमध्ये आहेत. एकेकाळी वॉशिंग्टन हाऊस असलेल्या ठिकाणीच लोढा अल्टामाउंट हे टॉवर उभं राहिलं आहे. अमेरिकी दुतावासात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी त्यावेळी वॉशिंग्टन हाऊसचा वापर केला जात होता. विशेष म्हणजे आता नवीन पत्त्यावर देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब अंबानी हे पटेल यांचे शेजारी असणार आहेत. कारण रिलायंस इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अर्थात एंटिलिया ही इमारत देखील अल्टामाउंट रोडवरच आहे. ‘या इमारतीला रहिवासी प्रमाणपत्र प्राप्त झालं असून पात चे सात कुटुंबियांनी घरात इंटेरियरचं काम देखील सुरू केलं आहे. दिवाळीपर्यंत हे कुटुंबीय इमारतीत राहण्यास जातील. या इमारतीतील फ्लॅटची इतकी किंमत असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे येथून कोणत्याही आडकाठीशिवाय थेट समूद्र दर्शन होतं’, असं दक्षिण मुंबईतील बांधकाम व्यावसायिक राजीव जैन म्हणाले.