तुमच्या वाढदिवसाच्या, लग्नाच्या किंवा कुठल्याही कार्यक्रमानिमित्त आयोजित पार्टीसाठी फेसबुकवरुन जर तुम्हाला निमंत्रण पाठवायचे असेल तर थोडं सावध राहा. आपण ते निमंत्रण सर्वांना पाठवत आहोत की आपल्या फ्रेंड्सलिस्टमधील व्यक्तींना पाठवत आहोत हे तपासूनच ते पाठवा. नाहीतर रुबीच्या वडिलांसारखी तुमची गत व्हायची.

मेक्सिकोमध्ये रुबी इब्बारा गार्सिया नावाच्या मुलीच्या पंधराव्या वाढदिवसासाठी तिच्या वडिलांनी एक व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्वांना वाढदिवसाच्या पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले. फेसबुक सेंटिंग्जमधील फ्रेंड्स ओन्ली ऐवजी ही पोस्ट पब्लिक झाल्यामुळे ही पोस्ट सर्वापर्यंत पोहचली. मेक्सिकन लोकांना या गोष्टीचा इतका आनंद झाला की मी पण येणार मी पण येणार म्हणत म्हणत ही पोस्ट व्हायरल झाली.

रुबीच्या पार्टीला किती जण येणार आहेत हे जर तुम्हाला कळले तर तुम्ही थक्का व्हाल. रुबीच्या पार्टीला येणार असल्याचे १० लाख लोकांनी ‘कन्फर्म’ केले आहे. आता १० लाख जणांसाठी पार्टी आयोजित करायची कशी हा प्रश्न रुबीच्या वडिलांना पडला आहे. रुबीचा वाढदिवस २६ डिसेंबर रोजी आहे. पूर्ण आठवडा ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे अनेक जणांनी म्हटले की त्या दिवशी मी फ्रीच आहे तेव्हा जरुर येईल.

मी अनोळखी असूनदेखील तुम्ही मला निमंत्रण पाठवल्याबद्दल धन्यवाद असे देखील काही जणांनी म्हटले आहे. रुबीची पार्टी पूर्ण मेक्सिकोसाठी चर्चेचा विषय बनला आहे. या पोस्टनंतर आपण ही पार्टी रद्द करणार नसल्याचे रुबीच्या वडिलांनी म्हटले आहे. रुबी आणि तिच्या वडिलांना अनेक टॉक शोज निमंत्रण मिळत आहे. रुबी आणि तिची वडील रातोरात प्रसिद्ध झाले असून विविध वाहिन्या त्यांच्या मुलाखती घेत आहे. एका पोस्टद्वारे इतकी प्रसिद्धी आधी मेक्सिकोत मिळाली नाही.

रुबीची पार्टी इंटरनेटवर गमतीचा विषय ठरली आहे. कुणी शॉपिंगला गेले असता रुबीच्या पार्टीसाठी मी हा ड्रेस विकत घेतला असे लोक पोस्ट करीत आहेत तर विमानतळावर चेक इन करणाऱ्यांनी लिहिले आहे की रुबीच्या पार्टीसाठी आम्ही मेक्सिकोला जात आहोत. मेक्सिको आमच्या स्वागतासाठी तयार राहा.

रुबीच्या पार्टीला कुणी जाणार असेल तर मला माझ्या घरुन प्लीज पिक करा असे देखील काही लोकांनी म्हटले आहे. एकंदरीतच पूर्ण मेक्सिको रुबीच्या पार्टीसाठी उत्सुक आहे. आपण कुणालाही येऊ नका असे रुबीच्या वडिलांनी म्हटल्यानंतर २६ डिसेंबरला ते इतक्या लोकांचे स्वागत कसे करतात याबाबतदेखील उत्सुकता निर्माण झाली आहे.