मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक कंपनी आपल्या मोबाईलची जाहिरात करण्यासाठी काही ना काही फंडे वापरत असते. कधी होर्डिंगद्वारे तर कधी टीव्हीवर नाहीतर ऑनलाईन जाहिरात करुन उत्पादनाचा खप वाढण्यासाठी प्रयत्न केले जातात. सॅमसंग ही पण सध्या मोबाईलच्या बाजारातील एक महत्त्वाची कंपनी आहे. मूळची दक्षिण कोरीयाची असलेली ही कंपनी नुकतीच एका गोष्टीत पकडली गेली आहे. कंपनीने आपल्या Samsung Galaxy A8 Star या स्मार्टफोनची जाहिरात करण्यासाठी डीएसएलआर कॅमेरा वापरुन फोटो काढले आहेत. मोबाईलमधील कॅमेराची गुणवत्ता दाखवण्यासाठी त्या मोबाईलने फोटो काढणे अपेक्षित असते. मात्र कंपनीने ग्राहकांची फसवणूक करत डीएसएलआर कॅमेरा वापरुन फोटो काढून ते आपल्या जाहिरातीसाठी वापरले आहेत.

Dunja Djudjic या फोटोग्राफरने एक फोटो काढला होता. त्यांनी काढलेले फोटो गेट्टीवर विकले जात आहेत असे त्यांना इमेलद्वारे कळाले. त्यानंतर त्यांनी या सर्व प्रकणावर संशोधन केले, त्यानंतर त्या आश्चर्यचकीत झाल्या. त्यांनी काढलेले फोटो सॅमसंग आपल्या जाहिरातीकरता वापरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सॅमसंगने आपले हे फोटो खरेदी केले आहेत का असे या फोटोग्राफरने संबंधित कंपनीला विचारल्यानंतर आपल्याकडे तसा कोणताही डेटा आलेला नाही असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर Djudjic यांनी सॅमसंगच्या मलेशिया ऑफीस आणि सॅमसंग ग्लोबल ऑफीसशी संपर्क केला. मात्र त्यांना याठिकाणी कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या फोटोवर ही इमेज कुठून घेण्यात आली असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. याआधीही चीनची कंपनी असलेल्या हुवावे या कंपनीवर अशाप्रकारे इमेज चोरल्याचे आरोप लावण्यात आले होते.