हिमाचाल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये सध्या एका व्हायरल व्हिडीओची प्रचंड चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या पाठीवर स्कूटी घेऊन एका हायवेवर चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ मागील काही दिवसांपासून चर्चेत असला तरी त्यामागील खरी माहिती आता समोर आलीय. पाठीवर संपूर्ण स्कूटर उचलून चालणाऱ्या व्यक्तीच्या या व्हायरल व्हिडीओचा संदर्भ इंधनाच्या वाढत्या दरांशी जोडला जात आहे. तर काहींनी या व्यक्तीची स्कूटी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने त्याने ती पाठीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केलाय. मात्र असं काहीही नसल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीने स्कूटी खांद्यावर घेऊन चालण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.

कुल्लूमधील गॅमन ब्रिजजवळचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्कूटी आपल्या पाठीवर घेऊन चालणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रकाश चंद असं असल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. कुल्लूपासून तीन किलोमीटर दूर असणाऱ्या न्यूली येथे प्रकाश राहतो. प्रकाश हा मजुरीचे काम करतो, अशी माहितीही समोर आली आहे. असं असतानाच आता प्रकाश कोणीची स्कूटी आणि कशासाठी आपल्या खांद्यावर घेऊन चालत होता असा प्रश्न विचारला जाणं सहाजिक आहे. मात्र या व्हायरल व्हिडीओमागील खरी माहिती समोर आली आहे. आधी हा व्हायरल व्हिडीओ पाहुयात…

झालं असं की, प्रकाश चंद आणि त्याच्या एका मित्राने स्कूटी उचलण्यावरुन २००० हजारांची पैंज लावली. स्कूटी खांद्यावर उचलून ठरलेलं अंतर चालून दाखवाल्याचं आव्हान प्रकाश समोर होतं. प्रकाशचा याच पैंजेदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल झालाय. प्रकाशला सोशल मीडियावर आता बाहुबलीही म्हटलं जात आहे. प्रकाशने हा सर्व प्रकार आम्ही मित्रामित्रांमध्ये गंमत म्हणून केल्याचे स्पष्ट केलं आहे. मी स्कूटी उचलू शकतो असा मला विश्वास होता. मात्र मी नियोजित ठिकाणापर्यंत स्कूटी घेऊन चालू शकतो नाही. यामध्ये स्कूटीमधील पेट्रोल संपवणं वगैरे असं काहीही घडलेलं नाही असंही प्रकाशने स्पष्ट केलं आहे. प्रकाशने स्कूटी उचलली तर खरी मात्र त्याला दिलेलं आव्हान पूर्ण करता आलं नाही आणि त्याने मध्येच थांबून स्कूटी खाली ठेवल्याने पैंज जिंकता आली आहे.