इंग्लंडच्या शाही परेडमध्ये पारंपरिक हॅटऐवजी पगडी घालून परेड करणाऱ्या चरनप्रीत सिंग यांनी इतिहास रचला आहे. महाराणी एलिझाबेथच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजार सैनिकांच्या शाही परेडमध्ये २२ वर्षीय चरनप्रीत यांचा समावेश होता. हे खास क्षण पाहण्यासाठी तिथं चरनप्रीत यांचे आईवडील आणि बहिणसुद्धा उपस्थित होते.

चरनप्रीत लहान असतानाच त्यांचे कुटुंबीय भारतातून इंग्लंडला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. २०१६ मध्ये इंग्लंडच्या सैन्यात चरनप्रीत गार्ड्समन म्हणून रुजू झाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘माझ्यासारखे बरेच जण सैन्यात सहभागी होतील अशी मला आशा आहे. या शाही परेडमध्ये सहभागी होणे ही माझ्यासाठी सर्वात सन्माननीय बाब आहे. इतिहासात या गोष्टीकडे एक सकारात्मक बदल म्हणून पाहिलं जाईल अशी मला आशा आहे.’

राणी एलिझाबेथचा वाढदिवस २१ एप्रिल रोजी साजरा केला जातो. दरवर्षी या वाढदिवसानिमित्त ‘ट्रूपिंग द कलर’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. जूनमध्ये आयोजिक केला जाणाऱ्या या कार्यक्रमात हजार सैनिकांच्या शाही परेडद्वारे राणीला मानवंदना दिली जाते.