रेल्वेच्या रुळांशेजारी अतिक्रमण केलेले आपण अनेकादा पाहिले असले. इतकेच काय तर अनेक ठिकाणी रेल्वे रुळापासून अगदी काही फूट अंतरावर दाटीवाटीने उभी राहिलेली अनधिकृत झोपडपट्टीही रेल्वे प्रवासात आपल्याला दिसते. पण याच रेल्वेरुळावर बाजार देखील भरु शकतो याची कल्पना तुम्ही क्वचितच केली असेल.
थायलंडमधील मेकेलाँग रेल्वे मार्केट हे याचसाठी प्रसिद्ध आहे.  येथे रेल्वे रुळावरच  जीवानावश्यक वस्तूंचा बाजार भरतो. भाजीपाल्यापासून फळे, मसाले अगदी मासळीसुद्धा या रेल्वे रुळांवर विकायला ठेवली जाते. या बाजारात सगळ्याच गोष्टी स्वस्त मिळतात. त्यामुळे येथले स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने या बाजारात खरेदी करण्यासाठी येतात. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या रेल्वे रुळावर हा बाजार भरतो त्या रेल्वे रुळावरून दिवसांतून अनेकदा रेल्वे देखील  जाते. दिवसातल्या काही ठराविक वेळेला येथून रेल्वे जाते. तेव्हा रेल्वेच्या हॉर्नचा आवाज आला की विक्रेते रेल्वे रुळावरून आपले सामान बाजूला हटवतात आणि रेल्वे गेले की पुन्हा आपल्या टोपल्या रेल्वे रुळांवर ठेवतात.
हे सामान रुळांच्या इतक्याजवळ असते की अगदी सामानाला चिटकून रेल्वे जाते. सारा काही समन्वयाचा खेळ. समन्वय चुकले की मात्र रेल्वे खाली येण्याची भिती असते. पण आता येथल्या स्थानिक लोकांना याची इतकी सवय झाली आहे की रेल्वे आली की ते पटकन बाजूला होतात. यातले काही विक्रेते असेही आहेत की जे जमिनीवर भाजी, फळे मांडतात. हा बाजार जगातील सर्वात धोकादायक बाजार आहे. यापूर्वी या बाजारात रेल्वेची धडक लागून अपघातही झाले आहेत.

व्हिडिओ सौजन्य – Thiren HD