पाकिस्तानी चहावाला, बांगलादेशी हिरो अलोम बोगरा, नेपाळची भाजीवाली आणि ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली भारतीय वंशाची चहावाली या सगळ्यांचे फोटो २०१६ मध्ये इंटरनेटवर व्हायरल झाले. सोशल मीडियाने या सामान्य चेह-यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. नेटीझन्सने तर यांना अक्षरक्ष: डोक्यावर घेतले. आता या यादीत सहभागी झालाय तो तुर्कीचा शेफ ‘सॉल्ट बे’ म्हणजेच नुसरत गोकसे.

वाचा : …म्हणून ‘जिया’चे सारे चिनी दिवाने

डोळ्यावर काळा चष्मा आणि नेहमीच शेफशी विसंगत अशा पेहरावात असलेल्या सॉल्ट बेने आपल्या स्टाईनलने आधीच तुर्की महिलांना घायाळ केले. खरं तर एखादा शेफ त्यांच्या पाककृतींसाठी आणि चवीसाठी प्रसिद्ध असतो पण सॉल्ट बे याला पूर्णपणे अपवाद आहे. कारण त्याच्या पाककृतीपेक्षा मीठ टाकण्याची त्याची स्टाईलच सगळ्यांना वेड लावत आहे. खरं तर, जखमेवर मीठ चोळणे, मीठाचा खडा टाकणे असे शब्द प्रयोग आपण करतो पण याच मीठाने सॉल्टला बेला प्रसिद्धी मिळवून दिली. मीठ टाकण्याच्या त्याच्या या सगळ्यात हटके स्टाईलने अनेकांना वेड लावले आहे. म्हणूनच त्याला नुसरत या नावापेक्षा सर्वजण सॉल्ट बे याच नावानेच अधिक ओळखतात.

 

प्रत्येक शेफची काहीना काही ओळख असतो. एखाद्या शेफची सिग्नेचर डिश म्हणजे ती पाककृती त्याची खासियत असते तर कोणी आपल्या अफलातून प्रेंझेंटशनसाठी ओळखला जातो. पण शेफच्या आतापर्यंतच्या या निकषांवर अक्षरश: मीठ चोळत या शेफने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मांसांचा एखादा तुकडा शिजवताना देखील तो आपली हटके स्टाईल वापरतो. त्याच्या व्हिडिओंना इन्स्टाग्रामवर मोठी पसंती मिळताना दिसत आहे.