टॅक्सी चालवून आपले घर चालवणा-या पंजाबमधल्या एका टॅक्सी चालकाच्या बँक खात्यात अचानक ९, ८०६ कोटी रुपये जमा झाले. या संपूर्ण प्रकरणाची  पोलीस चौकशी झाल्यानंतर यामागाचे सत्य उघड झाले आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अनेकांना आपले काळे धन कुठे लपवावे असे झाले आहे. अशातच पंजाबमध्ये राहणा-या टॅक्सी चालक बलविंदर सिंह यांच्या बँक खात्यात जवळपास ९, ८०६ कोटी जमा झाले आहेत. बलविंदर यांना त्यांच्या मोबाईल फोनवर असा संदेश आल्याने या संपूर्ण प्रकाराने ते चक्रावून गेले होते. बलविंदर सिंह यांनी जन धन योजनेअंर्तगत ‘स्टेट बँक ऑफ पंजाब’मध्ये आपले खाते उघडले होते. ते रोज आपली थोडी थोडी रक्कम या खात्यात जमा करायचे. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यात ९८, ०५. ९५, १२, २३१ इतकी रक्कम जमा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती ‘हिंदुस्तान टाइम्सने’ दिली. या संपूर्ण प्रकरणामुळे चक्रावून गेलेल्या बलविंदर यांनी बँक गाठली. परंतु, बँकेच्या कर्मचा-यांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या कर्मचा-यांनी त्यांचे जूने पासबुक ठेवून घेत त्यांना नवे पासबुक दिले.

असाच प्रकार याआधी त्यांच्याबाबतीत घडला होता. एका हिंदी बेवसाईटने दिलेल्या माहितीनुसार बलविंदरने तातडीने माहिती पोलिसांना दिली. त्यांच्या खात्यात इतके पैसे आले कुठून असा प्रश्न सगळ्यांनाच पडला, अखेर बँकेतील कर्मचा-यांच्या एका चुकीमुळे त्यांना असा संदेश आल्याचे पोलिसांनी सांगितले. या बँकेचे मॅनेजर संदीप गार्ग यांनी ही अनावधानाने झालेली चूक असल्याचे सांगितले. पैसे भरण्याच्या रकान्यात चुकून कर्मचा-यांनी बँक खात्याचा क्रमांक टाकल्याने हा घोळ झाल्याचे त्यांनी कबुल केले.