एखाद्या व्यक्तीकडे सोपवलेली जबाबदारी तिने नीट पार पाडली नाही आणि काहीतरी घोळ घातला की त्या व्यक्तीला अनेकदा नावं ठेवली जातात. अशा व्यक्तींना अनेकदा वेड्यात काढलं जातं. पुरणकथांमध्येही कालिदासबद्दल अशीच एक अख्यायिका सांगितली जाते. तो ज्या झाडाच्या फांदीवर बसला होता तिच कापण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नंतर हाच कालिदास संस्कृतमधील ज्ञानी व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्या कालिदासाच्या गोष्टीप्रमाणेच ज्या फांदीवर बसला आहे तीच फांदी तोडत असल्याशी साधर्म्य साधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती ताडाच्या झाडावर बसून तेच झाड तोडताना दिसत आहे.

काही लोकांनी या व्यक्तीला वेडं म्हटलं आहे. तर काहींनी या व्यक्तीला काय झालं आहे असा प्रश्न व्हिडिओ पाहून उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये एका वाकलेल्या उंच ताडाच्या झाडावर चढून एक व्यक्ती त्या झाडाचा पुढचा भाग म्हणजेच शेंडा तोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी ही व्यक्ती वाचणार नाही अशी शक्यताही व्यक्त केली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहताना हृदयाची धडधड वाढल्याचे म्हटले आहे.

मात्र अर्धवर्तुळाकार आकारामध्ये झुकलेल्या ताडाच्या झाडाचा शेंडा कापल्यानंतर पुढील भागाचे वजन कमी झाल्याने झाडाचे खोड जोरात झुलू लागले. हा व्यक्ती त्या खोडाला तसाच पकडून ते एका जागी स्थिर होण्याची वाट बघत तिथेच थांबल्याचे व्हिडिओ दिसत आहे. नंतर मागे पुढे वाऱ्यावर हेलकावे खात थोड्या वेळाने झाडाचे खोड एका जागी स्थिरावले आणि मग ही व्यक्ती खाली उतरली. हा व्हिडिओ अमेरिकेतील माजी बास्केटबॉलपटू रेक्स चैपमॅन यांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे.

“कधी तुम्ही कोणाला एखादं उंच ताडाचं झाडं कापताना पाहिलं आहे. खास करुन तेव्हा ज्यावेळी झाड कापणारी व्यक्ती स्वत: त्या झाडावर बसली असेल,” अशा कॅप्शनसहीत चैपमॅन यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. ३४ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये काही लोकं या व्यक्तीच्या वेडेपणावर हसताना ऐकू येत आहेत तर काहीजण या माणसाचा जीव धोक्यात असल्याची चिंता व्यक्त करत त्याला सल्ला देताना ओरडत असल्याचे ऐकू येत आहे.

अनेक पेजेस आणि ट्विटर हॅण्डलवरुन हा व्हिडिओ मागील दोन आठवड्यांपासून शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे यासंदर्भातील वेगवेगळे दावे केले जात आहे. मात्र लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी याला वेडेपणा म्हटलं आहे तर काहींनी मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी त्या व्यक्तीला जिवावर उदार होऊन काम करावं लागत असल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.