विषाची परीक्षा घेणे काय असते हे आपल्याला माहित आहे. विष हे धोकादायक असून त्यामुळे प्रसंगी जीवही जाण्याची शक्यता असते. सापाला भलेभलेही घाबरतात पण या दोन लहानग्यांचे सापाला सहज हाताळत असल्याचे व्हिडियो नुकतेच व्हायरल झाले आहेत. हे व्हिडियो पाहून आपल्याही अंगावर अगदी सहज काटा येईल. पण त्यांना या सापाला हाताळताना काहीच भिती वाटत नसल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. हा व्हिडियो चीनमधील असून हा लहानगा आपल्या वडिलांना मॅटखाली असलेले साप हाताने उचलून देत असल्याचे यामध्ये दिसत आहे. या कुटुंबाचा स्नेक ब्रिडींगच्या व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे एका शेडमध्ये असंख्य साप असल्याचे दिसत आहे.

२ मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये हा लहानगा अजिबात न घाबरता साप हाताळताना दिसत आहे. विशेष म्हणजे काहींना तो शेपटीकडून उचलत आहे. तर काहींना तोंडाकडूनही अगदी सहज न घाबरता उचलत असल्याचे दिसत आहे. दिसत असलेले साप उचलून झाल्यावर हा चिमुकला कार्पेटच्या खाली असणारे इतर साप शोधत असल्याचेही दिसत आहे. त्याला हे कार्पेट उचलता येत नसल्याने बाजूला असणाऱ्या व्यक्तीने त्याला ते उचलून दिले आणि मग त्याने पुढचे साप उचलले हेही व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे. आता हे साप विषारी आहेत की बिनविषारी याबाबत माहिती मिळालेली नाही.

तर लहानग्याचे साप हाताळण्याचे हे नखरे आणखीही एका व्हिडियोतून समोर येत आहेत. असाच आणखी एक व्हिडियो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ३० सेकंदाच्या या व्हिडियोमध्ये अजगराशी एक लहानगा अगदी सहज खेळत असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर या अजगराच्या अंगावर लोळत त्याच्या मध्ये बसून त्याच्याशी खेळत आहे. त्यानंतर हा लहानगा या अजगराच्या तोंडाशीही खेळत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. या व्हिडियोला आतापर्यंत ७ लाख ९० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.