आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याची एक वेगळी जागा असते. त्यात बहीण भावाचं नातं हे त्यातल्या त्यात अत्यंत खास असतं. लहानपणापासून एकमेकांचा हात धरुन मोठे झालेले बहीण-भाऊ यांच्यातल नातं म्हणजे ‘टॉम अॅण्ड जेरी’सारखंच असतं. ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं..’असं असलेल्या या नात्यामध्ये कितीही तक्रारी असल्या तरीदेखील एकमेकांची काळजी घेणं हे ओघाओघाने येतं. विशेष म्हणजे याचा प्रत्यय नुकताच इस्तंबूलमध्ये पाहायला मिळाला आहे. एका लहान बहिणीने आपल्या भावाला लिफ्टमधून वाचवल्याचं घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ इस्तंबूलमधील असून येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये ही घटना घडली आहे. ही घटना लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. इस्तंबूलमध्ये एका इमारतीत राहणाऱ्या दोन लहान बहीण भावांना इमारतीमधील लिफ्टमध्ये प्रवेश केला. प्रवेश करत असतानाच यापैकी एका लहान मुलाच्याभोवती एक दोरी गुंडाळली गेली होती. मात्र त्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. लिफ्ट सुरु झाल्यानंतर अचानकपणे या ही दोरी मुलाच्या गळ्यापाशी आली आणि त्याला फास बसला. लिफ्ट जशी पुढे सरकरत होती, तसं या मुलाच्या गळ्याभोवतीचा फास जास्त आवळला जाऊ लागला. समोर घडत असलेलं हे चित्र पाहिल्यानंतर मुलाच्या बहिणीने प्रसंगावधान राखत पटकन मुलाला सोडविण्याच प्रयत्न केला. त्यासोबतच इमरजन्सीचं बटन दाबलं. तिने दाखविलेल्या या प्रसंगावधानामुळे या लहान मुलाचा जीव वाचला.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून सर्व स्तरांमधून या मुलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.