एखादी कल्पना राबवताना किमान शंभरवेळा विचार करावा असं शहाण्या माणसांनी आपल्याला सांगून ठेवलं आहे. पण, हे विचार एका चीनमधल्या रेस्तराँनं फारसे गांभीर्यानं घेतले नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे आणि हे कर्ज थोडंथोडकं नसून भारतीय मूल्याप्रमाणे तब्बल ५३ लाखांचं आहे.

अधिकाधिक ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी त्यांनी अनलिमिटेड फूटची ऑफर ग्राहकांना दिली होती. ठराविक रक्कम भरून महिनाभर हवं तेवढं जेवण जेवण्याचा आस्वाद घ्या अशी ऑफर जेमिनर रेस्तराँनं ग्राहकांना दिली होती. ही ऑफर ऐकताच ग्राहकांची अक्षरश: गर्दी रेस्तराँमध्ये व्हायला लागली. अमर्यादित जेवण घेण्याची मुभा असल्यानं ग्राहकांनी या संधीचा पुरेपुरे फायदा उचलला. अखेर दोन आठवड्यात या रेस्तराँला आपली कल्पना पूर्णपणे फसल्याची जाणीव झाली. कारण नफा न होता ५३ लाखांचं कर्ज या रेस्तराँवर चढलं.

आम्ही या ऑफरमुळे कर्जबाजारी झालो आहोत पण असं असलं तरी आम्हाला प्रामाणिक ग्राहक हवे आहेत जे ही ऑफर बंद झाल्यानंतरही आमच्या रेस्तराँमध्ये येतील अशी प्रतिक्रिया या हॉटेलच्या मालकानं काही दिवसांपूर्वी दिली होती. या हॉटेलमध्ये दरदिवशी ५०० हून अधिक ग्राहक भेट देत होते. अखेर कर्जाचा मोठा डोंगर पाहता हे हॉटेल बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.