उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नसोहळा आटोपल्यानंतर काही तासांतच एका नववधूनं मुलाला जन्म दिला आहे. यामुळे नवऱ्यामुलासह त्याच्या कुटुंबियांनादेखील याचा दबरदस्त धक्का बसला असून त्यानं आपल्या पत्नीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

काही स्थानिक वृत्तपत्रांच्या माहितीनुसार उन्नावमधील सकहन मुसलमानन गावात हा प्रकार घडला आहे. २० फेब्रुवारीला यागावचा रहिवासी असलेल्या सुमेर पासीचा विवाह पार पडला. लग्नाच्या विधी आटोपल्यानंतर वरात निघाली. लग्नाला काही तास उलटत नाही तोच सुमेरच्या पत्नीची तब्येत बिघडली. गावातील इतर महिला तिच्या मदतीला धावून आल्या. पण, नंतर मात्र नववधुची तब्येत बिघडली नसून ती गर्भवती असल्याचं महिलांच्या लक्षात आलं. तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या होत्या.

त्यानंतर तिनं मुलाला जन्म दिला. हा सर्व प्रकार पाहून सुमेर आणि त्याच्या कुटुंबियांना याचा जबरदस्त धक्का बसला. विशेष म्हणजे नववधू लग्नाच्या वेळी ९ महिन्यांची गर्भवती आहे हे कोणाच्याही लक्षात न आल्यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणानंतर पासी कुटुंबियांकडून नववधूच्या कुटुंबियांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली  असल्याचं समजत आहे.