कॅनडामधील टोरांटो येथे एका व्यक्तीने नग्न होत थेट एका माशांच्या टँकमध्ये उडी मारली. आता यामध्ये साधेसुधे मासे असते तर ठीक, पण या टँकमध्ये होते चक्क शार्क मासे. मत्स्यालयात रात्री उशीरा सुरु असणाऱ्या शोनंतर हा प्रकार घडला असून या व्यक्तीने टँकमध्ये उडी कशी मारली याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून त्यावरील चर्चांना उधाण आल्याचे दिसत आहे. यामध्ये इतर जलचरांबरोबरच १७ शार्क मासे होते अशी माहिती मस्त्यालयाकडून देण्यात आली आहे. या टँकचे नाव ‘डेंजरस लगून’ असून यामध्ये २९ लाख लिटर पाणी आहे.

नग्नावस्थेत टँकमध्ये उडी घेऊन पोहणाऱ्या या व्यक्तीची ओळख पटली असून डेव्हीड विवर असे त्याचे नाव आहे. तो ३७ वर्षांचा असून त्याने याआधीही अशाप्रकारचे काही हिंसक हल्ले केल्याची नोंद आहे. डेव्हीड याने अचानकपणे कपडे काढून या टँकमध्ये उडी मारल्याने त्याच्या जीवासाठी धोका होता. आताही पाच किलोमीटर असलेल्या या टँकमध्ये पोहताना डेव्हीड याला बरीच इजा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला बाहेर येण्यास सांगितले. मात्र त्याने बाहेर येण्यास नकार दिला. बाहेर आल्यानंतरही त्याने याठिकाणहून पळ काढला. या घटनेनंतर या मस्त्यालयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.