मध्य प्रदेशमधील पेंच नदीच्या पात्रामध्ये सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं आहे. छिंदवारा जिल्ह्यातील पेंच नदीमधील दगडावर सेल्फी काढण्यासाठी दोन तरुणी अगदी पात्राच्या मध्यभागी गेल्या. इतक्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोघीही तेथे अडकल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना सुखरुपपणे बाहेर काढले. त्यांच्या बचावकार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नदी पात्रातील पाणी वाढल्याने दगडावर अडकलेल्या या मुलींना स्थानिकांनी आणि पोलिसांनी वेळीच मदत केल्याने त्यांचा जीव वाचला. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार या तरुणी काही मित्रमैत्रिणींबरोबर वर्षा सहलीसाठी या नदी किनारी आल्या होत्या. त्यावेळी या दोघांना नदीच्या पात्रात वर आलेल्या एका खडकावर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. दोघीही गुडघाभर पाण्यातून त्या खडकावर पोहचल्या. मात्र त्यानंतर नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि या दोघीही अडकल्या.

पाण्याचा वेग पाहून या तरुणींबरोबरच्या कोणीही त्यांना वाचवण्यासाठी नदीत उतरण्यास तयार नव्हते. अखेर त्यांनी स्थानिकांना यासंदर्भात माहिती दिली. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना याबद्दल कळवले. काही मिनिटांमध्येच स्थानिक नागरिकांनी या तरुणींना बाहेर काढण्यासाठी रस्सीच्या मदतीने मदतकार्य सुरु केलं. थोड्याच वेळात पोलीस दलातील कर्मचारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्यामध्ये पुढाकार घेत या मुलींना बाहेर काढलं. स्थानिक आणि पोलिसांनी एक तास प्रयत्न केल्यानंतर या तरुणींना बाहेर काढण्यात यश आलं.

या घटनेमधून पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये भटकंतीसाठी जाताना काळजी घेणे, नदीच्या पाण्यात न उतरणे यासारख्या मुख्य गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पुन्हा अधोरेखित झालं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे सेल्फीच्या मोहापायी नदीपात्रामध्ये अडकल्याने अनेकजणांना प्राणाला मुकावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत.