भारताच्या किनारपट्टी भागांमध्ये डॉल्फिन मासे अल्प प्रमाणात अडळून येतात. मात्र भारतामध्ये चक्क कालव्यांमध्ये काही डॉल्फिन मासे शिरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय वन सेवा अधिकारी असणाऱ्या प्रवीण कासवान यांनी ट्विटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कालव्यामध्ये डॉल्फिन मासे दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या माश्यांना पाहण्यासाठी जवळजवळ १० हजार लोक कालव्यांच्या आजूबाजूला गोळा झाल्याचेही प्रवीण यांनी ट्विटवर म्हटलं आहे.

प्रवीण यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “अचानक एका कालव्यामध्ये डॉल्फिन मासे अढळून आले. नक्की किती मासे होते हे सांगता येणार नाही. पण त्या माश्यांना पाहण्यासाठी जवळजवळ दहा हजार लोक जमा झाले.” या कॅप्शनसहीत प्रवीण यांनी एक व्हिडिओ सेअर केला असून या व्हिडिओमध्ये गढूळ पाण्यामधून अचानक डॉल्फिनचे कल्ले वर येताना दिसत आहेत. प्रवीण यांनी ही घटना नक्की कुठे घडली याची माहिती दिली नाही. व्हिडिओमध्ये स्थानिक लोक डॉल्फिन माश्यांना पाहिल्यावर मोठ्याने आरडाओरड करताना दिसतात.

प्रावीण आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात, “गर्दी एवढी वाढत गेली की नंतर काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून लोकांना सुचना करण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर करावा लागला.”

त्यानंतर बरेच तास प्रयत्न करुन वनअधिकाऱ्यांनी या डॉल्फिनला पुन्हा नदीपात्रापर्यंत नेले. हे अंतर जवळजवळ १३ किलोमीटरचे होते असं प्रवीण यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे डॉल्फिन मासे हे गँगटीक डॉल्फिन प्रजातीचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या डॉल्फिनची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने प्रवीण यांनी शिकारीच्या भितीने ही घटना कुठे घडली त्या ठिकाणाचे नाव दिले नसल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. २०१८ साली राजस्थानमध्ये असाच प्रकार घडला होता. त्यावेळी एक गँगटीक डॉल्फिन मासा इंदिरा कालव्याच्या पाण्यामध्ये शिरला होता. वनखात्याने बऱ्याच प्रयत्नानंतर या माश्याला बाहेर काढले मात्र त्यानंतर तासाभरातच त्याचा मृत्यू झाला होता.