आपल्या बाईकवरुन भटकंतीला जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण भारतामध्ये कमी नाही. अशा तरुणांना नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांनी अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची चौकशी करणेही नवीन नाही. मात्र तामिळनाडूमधील पोलिसांनी एका अशाच भटक्याला अगदीच आगळ्यावेगळ्या कारणासाठी थांबवले. या घटनेचा व्हिडिओ या तरुणानेच आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे.

मुंबईहून तामिळनाडूमधील मदुराई येथे बाईकवरुन सोलो ट्रीपला निघालेल्या तरुणाने आपल्या RideWithKC या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये नाकाबंदीजवळ पोलिसांनी तरुणाला थांबवल्याचे दिसते. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाकडे कागदपत्रांची मागणी केली. त्याने आपल्या बीएमडब्ल्यू आर १२०० जीएस या स्पोर्ट्स बाईकची सर्व कागदपत्रे दाखवली. दरम्यान इतर पोलीस हवलदार या तरुणाला वेगवगेळे प्रश्न विचारु लागले. आपण कागदपत्रे दाखवल्यानंतरही पोलीस इतके प्रश्न का विचारत आहेत हे त्या तरुणाला समजत नव्हते. अखेर काही वेळाने समजले की पोलिसांना बाईक बघायची असल्याने त्यांनी आपल्याला थांबवल्याचे या तरुणाच्या लक्षात आले.

भारतामध्ये महागड्या स्पोर्ट्स बाईक क्वचितच दिसतात. इतक्या महागड्या स्पोर्टस बाईक परवडणारे खूपच बाईकप्रेमी देशात आहेत. त्यातच अशा बाईक दिसल्यावर अनेकांच्या नजरा आपोआप वळतात. असंच काहीसं या पोलिसांबरोबर झालं. या पोलिसांनी या बाईकवर बसून हौसेने फोटोही काढून घेतले. अर्थात त्या आधी त्यांनी या तरुणाला ‘गाडीवर बसून आम्ही एक फोटो काढू शकतो का?’ असं विचारत परवानगीही घेतली.


या तरुणाकडे असणारी बीएमडब्ल्यू आर १२०० जीएस आणि बीएमडब्ल्यू आर १२०० जीएस अॅडव्हेंचर या स्पोर्ट्स बाईक २०१८ साली भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झाल्या. या भारतामध्ये विकलेल्या गेलेल्या बीएमडब्यू कंपनीच्या सर्वात लोकप्रिय बाईक्स ठरल्या.